शिक्षण व्यवस्था बहुवैविध्य, बहुभाषिक करण्याकडे अधिक भर ; प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्ययन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार आहे. मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रमात एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल. त्यामुळे शिक्षण व्यवस्था ही बहुवैविध्य आणि बहुभाषिक होईल. असे प्रतिपादन प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग विकासचंद्र रस्तोगी यांनी केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता शासन स्तरावर विविध समित्यांचे गठण करण्यात आले होते. डॉ. रविंद्र कुलकर्णी, माजी प्र-कुलगुरु, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या अहवालानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अमंलबजावणी करण्याकरिता नुकतीच सर्च (शोधग्राम) चातगांव, गडचिरोली ,येथे गोंडवाना विद्यापीठामार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.कार्यशाळेचे अध्यक्ष कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, डॉ. प्रशान्त बोकारे होते. प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे ,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, संयोजक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी समिती डॉ.विवेक जोशी यांची ही यावेळी उपस्थिती होती.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे अध्यक्ष स्थानावरून बोलतांना म्हणाले, अनेक शंका प्रत्येकाच्या डोक्यात आहे त्याचे निरसन करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.असे ते म्हणाले.
विविध महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापकांचा यात समावेश होता. यावेळी विकासचंद्र रस्तोगी यांनी उपस्थित प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या शंकांचं निरसन केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० समितीचे संयोजक डॉ. विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा घेण्यात आली .प्रास्ताविक डॉ. श्रीराम कावळे यांनी ,संचालन डॉ. प्रिया गेडाम ,आभार कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी मानले.