अॅड. बोधी रामटेके यांच्या 'न्याय' पुस्तकाचे प्रकाशन...
- जिल्हाभरातील १२ मान्यवरांना समाजप्रेरक पुरस्कार...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आदिवासींच्या न्याय- हक्काच्या लढाईत महत्वाचे ठिकाण असलेल्या धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावात अॅड. बोधी शाम रामटेके यांच्या न्याय या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमात जिल्हाभरात आदिवासी प्रश्नांना घेऊन काम करणाऱ्या मान्यवरांना 'समाजप्रेरक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ आंबेडकरी विचारवंत नरेन गेडाम, मानवीहक्क कार्यकर्ते अॅड. लालसू नोगोटी, वनहक्क कायद्याचे प्रवर्तक देवाजी तोफा, रिपब्लिकन नेते रोहिदास राऊत , आमदार डॉ. देवराव होळी, कुसुमताई आलाम, यशोधराताई उसेंडी, सरपंच नंदाताई दुगा व अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात कोरची, धानोरा, एटापल्ली, चामोर्शी, भामरागड सह इतर भागातील ग्रामसभेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिन्ना महाका, नरेश कंदो, सुमित पाकलवार, बाजीराव नरोटे, झाडूराम हलमी, किरण आलाम, कुमारीबाई जमकातम, अनुप कोहळे, साई तुलसीगरी, सुनील नेवारे, दामोदर कोवासे, अॅड. श्रावण ताराम यांच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांना पाथ फाउंडेशन तर्फे 'समाजप्रेरक पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
आदिवासी समाजाच्या संस्कृती, शिक्षण, भाषा, कला यांच्यावर व्यवस्थेकडून वारंवार आक्रमण होत आहे, हे आक्रमक थांबविण्यासाठी एकत्रित येऊन लढायला हवे असे मत अॅड. लालसू नोगोटी यांनी व्यक्त केले.
तर आदिवासी समाजाला इथली वनसंपदा श्रीमंत करते, पण त्यावर अतिक्रमण करुन त्यांना गरिबीच्या खाईत ढकलले जात आहे. जिल्ह्यातील गरीबी ही मानवनिर्मित आहे, असे मा. देवाजी तोफा म्हणाले.
कार्यक्रमात सत्यशोधक बुक्स व ग्रामसभेकडून पुस्तक विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. जवळपास ८-९ हजारांच्या पुस्तकांची लोकांनी खरेदी केली. सोबतच न्याय या प्रकाशित झालेले पुस्तक विविध ग्रामसभेला मोफत देण्यात आले.
आदिवासी व इतर शोषित समाजाची न्याय हक्काची लढाई मजबूत करण्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक सर्वांना उपयोगी ठरेल असा आशावाद अॅड. बोधी रामटेके यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पंकज नरुले, प्रस्तावना धर्मानंद मेश्राम, तर आभार इतिहास मेश्राम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नम्रता मेश्राम, स्नेहा मेश्राम, अपेक्षा रामटेके व स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली.
विशेष - या कार्यक्रमात "विदर्भ न्यूज इंडिया" चे मुख्य संपादक श्री. राजेश खोब्रागडे यांच्यासह वी.एन.आय मीडिया ग्रुप उपस्थित होता.