Vidarbha News India - VNI
गडचिरोली: वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : धान कापणी करून घरी परतणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज, शनिवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा गावानजीक घडली. मंदा संतोष खाटे (३८), असे मृत महिलेचे नाव आहे.मंदा खाटे यांच्या मालकीच्या शेतात आज धान कापण्याचे काम सुरू होते.
त्याकरिता मजूर महिलांसह मंदा खाटे ह्यासुद्धा शेतात गेल्या होत्या.
संध्याकाळी काम आटोपल्यानंतर इतर महिला घरी परत गेल्या. मात्र, मंदा खाटे शेतात काम करीत राहिल्या. ५ वाजताच्या सुमारास घरी परत जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अमिर्झा परिसरात यंदा वाघाने दोन ते तीन जणांना ठार केले आहे. वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत झाले असून, शेतीची कामे करणे धोकादायक ठरत आहे.