दि . ६ डिसेंबर २०२२
आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान ; डॉ.अनिल शिंगरे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान वाखन्याजोगे असून कालपरत्वे त्यांच्या कार्याची उंची व प्रतिमा ही दिवसेंदिवस उंचावतच आहे. राष्ट्राच्या पुनर्बाधणीमध्ये त्यांचे विचार आजही संपन्न राष्ट्राचे द्योतक असल्याचे प्रतिपादन सहयोगी प्रा. संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड परभणी डॉ.अनिल शिंगरे यांनी प्रमुख वक्ता म्हणून केले.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक,आणि राजकीय कार्याचा उल्लेख करत त्यांनी या क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनिय कामगिरीमुळे भारतात अनेक आमूलाग्र बदल घडून आले असल्याचे त्यांनी नमुद केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने 'आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ' या विषयावर डॉ. आंबेडकर विचारधारा केंद्र गोंडवाना विद्यापीठ, तर्फे व्याख्यानाचा कार्यक्रम आज गोंडवाना विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, मानव विद्याशाखीय अधिष्ठाता डॉ. चंद्रमाऊली संचालक नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य डॉ. मनीष उत्तरवार उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी प्रशांत पुनवटकर यांनी भीम गीत सादर केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक प्रश्नांचा विचार केला ते एका समाजापुरते मर्यादित नव्हते ते संपूर्ण देशाचे आहेत असे विचार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशाल बुद्धिमत्तेचे धनी होते, ते आपल्या साऱ्यांसाठीच आदर्श आहे. जगाच्या आणि मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्या कार्यापासून आपण बोध घ्यायला हवा आहे. असे मनोगत प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी व्यक्त केले.
शिक्षकेतर कर्मचारी निलेश काळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. शिल्पा आठवले यांनी तर आभार प्रा. डॉ.रूपाली अलोणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आंबेडकर विचारधारा केंद्राच्या समन्वयक तसेच प्रा. डॉ. प्रीती पाटील काळे, प्रा.डॉ. प्रमोद जावरे, प्रा.डॉ.विनायक शिंदे , प्रा.डॉ.प्रिया गेडाम, प्रा.डॉ. नंदकिशोर माने यांनी परिश्रम घेतले.