राज्यघटना केवळ पुस्तक न राहता जगण्याचे साधन ; कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : पुढील ५० वर्षात जगातील सर्व देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण जग आत्मसात करेल. तसेच भारतीय संविधानाचा जगातील सगळे देश अनुकरण केल्याशिवाय राहणार नाही. संविधानामध्ये जे मूलभूत तत्व आहे ते आपण अंगीकारले पाहिजे राज्यघटना हे केवळ पुस्तक न राहता जगण्याचं साधन होईल असं प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी 'संविधान स्त्री हक्क आणि वर्तमान' या एक दिवसीय चर्चासत्राच्या वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.
प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी अँड. डॉ. अंजली साळवे विटणकर, तर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, तसेच सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम, विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे ,कुलसचिव अनिल हिरेखन, सुप्रसिद्ध लेखिका स्तंभ लेखिका तथा सामाजिक कार्यकर्ता माधुरी साकुळकर, संविधानाचे अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार आदी उपस्थित होते.
'संविधानातील स्त्रीहक्क : वर्तमानातील वास्तव ' यावर बोलताना अँड.अंजली साळवे विटणकर म्हणाल्या, स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकते. स्त्री कर्तुत्वगुणांमुळे प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे पण तरीदेखील स्त्री बाहेर आणि घरात सुरक्षित आहे का हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. राजकीय क्षेत्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येकीची कहाणीही वेगळी असते. महिलांनी महिलेला साथ देणं आजच्या काळात खूप गरजेचे झालय आणि प्रत्येक महिलेला स्वतःचा अस्तित्व शोधता आले पाहिजे.
बेटी बचाव - बेटी पढाव मोहीम, स्त्रियांचे सामाजिक स्थान व आजच्या परिस्थिती चे अवलोकन,स्त्री वर होणाऱ्या अत्याचार, बलात्कार, यावरही त्यांनी विचार मांडले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम म्हणाल्या, मनुष्याला जगण्यासाठी जशी ऑक्सिजनची गरज आहे तसेच गरज या संविधानाची आहे संविधानामुळे आपण विविध क्षेत्रात कार्य करू शकतो.
प्रशांत पुनवटकर यांनी संविधान गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले. संचालन प्रा. डॉ. सविता गोविंदवार यांनी तर आभार प्रा. शुभम बुटले यांनी मानले.
कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.