दि. १६.०२.२०२३
Vidarbha News India - VNI
'टाईमपास नाही करत आपण सिरीयसली...' म्हणत 16 वर्षीय मुलाचं टोकाचं पाऊल,"व्हॅलेंटाईन डे"च्या दिवशीची घटना!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/गोंदिया : राज्यात दिवसेंदिवस अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. औरंगाबाद येथील एकाच महाविद्यालयातील दोघांनी आत्महत्या केल्यानंतर "व्हॅलेंटाईन डे"च्या दिवशीच दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
ही घटना ताजी असतानाच आताच गोंदियातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका 16 वर्षांच्या मुलाने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. काय आहे संपूर्ण प्रकरण - "टाईमपास नाही करत आपण सिरीयसली प्रेम करतोय तुझ्यावर", असे म्हणत 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथे ही घटना घडली.
त्याच्याजवळ सुसाईड नोटही आढळून आली आहे. सुसाईड नोटमध्ये काय लिहिले - गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहाडी येथे एका 16 वर्षीय बालकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहेत. आत्महत्येपूर्वी या बालकाने सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे कळत आहे.
या सुसाईड नोटमध्ये "i love you....टाईमपास नाही करत आपण सिरीयसली प्रेम करतोय तुझ्यावर...." असे लिहले आहे. एकतर्फी प्रेमातून 16 वर्षांच्या मुलाने केलेल्या आत्महत्येच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. तर परिसर सुन्न झाला आहे.
नसांगता व्हॅलेटाईन साजरा करण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगुलाचा मृत्यू - परवा (14 फेब्रुवारी) सर्वत्र व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यात आला. यातच एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आपल्या कुटुंबाला न सांगता गोव्याला गेलेल्या एका प्रेमी युगुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गोव्यातील पाओलिम बीच परिसरामध्ये ही घटना घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रिया दुबे (वय 26) आणि विभू शर्मा (वय 27), अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. सुप्रिया आणि विभू हे एकमेकांचे नातेवाईक असून, ते गोव्यात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दोघे गेल्या काही दिवसांपासून गोव्यात होते. एकत्र सुट्टी घालवण्यासाठी ते गोव्यात आले होते.
स्थानिकांनी सोमवारी रात्री दोघांना पाओलिम बीचजवळ फिरताना पाहिलं होतं. कोकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया आणि विभू हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. सुप्रिया कामानिमित्त बेंगळुरूमध्ये राहत होती तर विभू दिल्लीमध्ये राहत होता. व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यासाठी ते गोव्याला आले होते, असा अंदाज आहे. दोघांचा मृत्यू नेमक्या कशा परिस्थितीमध्ये झाला, हे अद्याप उघड झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.