दि. ४ फेब्रुवारी २०२३
स्थानिक भाषा पुढील पिढीकडे हस्तांतरित करणे गरजेचे ; डॉ. श्रीराम गहाणे
गोंडवाना विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : स्थानिक भाषांच्या वाढीसाठी आणि त्यांचे जतन करण्यासाठी त्यांना प्राधान्य देणे, स्थानिक भाषेतील साहित्याला अभ्यासक्रमाचा भाग बनवणे तसेच स्थानिक भाषेचा वारसा जतन करून ठेवणे आणि पुढील पिढीला तो हस्तांतरित करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.श्रीराम गहाणे आदर्श महाविद्यालय, देसाईगंज, वडसा यांनी केले .'साहित्य व बोलीभाषा संवर्धन'या विषयावर ते बोलत होते. 'लुप्त होत असलेल्या बोलीभाषा' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते .त्या परिसंवादाचा समारोप नुकताच पार पडला.
राष्ट्रीय परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी डॉ.श्रीराम गहाणे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सांगितल्याप्रमाणे झाडीबोली या भाषेला जतन करून स्थानिक मातृभाषेवर भर देत मातृभाषेचे महत्त्व सांगितले.
व्दीतीय सत्रामध्ये रमेश कोरचा यांनी 'गोंडी भाषे समोरील आव्हाने ' व नंदकिशोर नरताम 'गोंडी भाषा व साहित्याची भुमिका ' या विषयावर सादरीकरण केले. यानंतर काही संशोधकांनी आभासी पद्धतीने सादरीकरण केले .शेवटच्या सत्रात मानवविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि इंग्रजीबरोबर स्थानिक भाषांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे सांगितले .संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी गोंडी, छत्तीसगढी, तेलगू आणि इंग्रजी भाषांमधून केले. परिसंवादाला संशोधक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.विवेक जोशी ,डॉ. शिल्पा आठवले,डॉ. प्रमोद जावरे, डॉ. वैभव मसराम, डॉ. रजनी वाढई, डॉ. प्रिया गेडाम यांनी परिश्रम घेतले.