दि. २०.०२.२०२३
Vidarbha News India - VNI
महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर नक्षलवाद्यांचा हल्ला; 2 जवान हुतात्मा...
विदर्भ न्यूज इंडिया
गोंदिया : महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर असलेल्या राजनांदगाव येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले आहेत तर एक जण जखमी झाला आहे. राजनांदगाव जिल्ह्याच्या बोरतलाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
गोंदिया, महाराष्ट्र सीमेवर असलेल्या चेक पोस्टवर ड्युटीवेळी अचानक जंगलातून आलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. राजेश हवलदार आणि ललित आरक्षक असे हुतात्मा झालेल्या जवानांची नावे आहेत. डीएसपी नक्षल ऑपरेशन अजित ओंगरे यांनी सांगितले की, आज (सोमवार) सकाळी आठच्या सुमारास जवान सीमेवर ड्युटीसाठी तैनात होते. चेक पोस्टवर वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. नक्षलवाद्यांनी दुचाकींनासुद्धा आग लावली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.