दि. 2 फेब्रुवारी 2023
Vidarbha News India - VNI
10 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन 'वंदे भारत' रेल्वेगाड्या धावणार...
विदर्भ न्यूज इंडिया
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या अखेरपर्यंत करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. यासह राज्यात सध्या 8 'वंदे भारत' रेल्वेगाडया सुरू असून येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली.
दानवे म्हणाले, यंदाचा अर्थसंकल्प मध्यम वर्गीयांना न्याय देणारा व दूरदृष्टी ठेवून मांडलेला आहे. रेल्वेला वर्ष 2014 पासून भरीव आर्थिक तरतूद केली जाते. महाराष्ट्राला 16 हजार कोटी रूपये मागील अर्थसंकल्पात देण्यात आले होते. त्यातून राज्यातील रेल्वे प्रकल्पाची बरीच प्रलंबित कामे झालेली आहेत.
भारतात येत्या काळात एकूण 400 'वंदे भारत' रेल्वेगाडया धावतील. यातील सध्या 8 वंदे भारत रेल्वेगाड्या राज्यात आहेत. येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन 'वंदे भारत' रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची, माहिती दानवे यांनी यावेळी दिली. या वंदे भारत रेल्वेगाड्या सोलापूर ते मुंबई आणि दूसरी मुंबई ते शिर्डी अशा असणार आहेत.
दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेस 2.0 अनेक उत्कृष्ट आणि अधिक गतीचा अनुभव देते. ही रेल्वेगाडी प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, यात रेल्वे गाड्यांची धडक टाळण्यासाठीची स्वदेशी विकसित ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम - कवच समाविष्ट आहे. वंदे भारत 2.0 अधिक अत्याधुनिकतेने सुसज्ज आहे आणि ही गाडी केवळ 52 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकतो आणि या रेल्वेगाडीचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर पर्यंत पोहोचतो, ही या रेल्वेगाडीची सुधारित वैशिष्ट्ये आहेत.