दि. १.०३.२०२३
केवळराम हरडे महाविद्यालय येथे करियर मार्गदर्शन व फेलोशिप कार्यशाळा संपन्न
गडचिरोली/चामोर्शी : संकल्प एज्युकेशन फाऊंडेशन आणि नेहरू युवा केंद्र गडचिरोलीच्या वतीने उच्च शिक्षणाच्या संधी आणि विविध क्षेत्रातील फेलोशिप्स या विषयाची कार्यशाळा केवळराम हरडे महाविद्यालय चामोर्शी येथे नुकतीच पार पडली.ग्रामीण भागातील विद्यार्थी अजुनही पारंपरिक पदवी आणि पदविकांच्याच वाटेने जात आहेत. विविध विद्याशाखेतील उच्च शिक्षणाच्या संधी आणि विविध क्षेत्रातील फेलोशिप याबद्दल अजुनही हवी तशी जागरूकता त्यांच्यामध्ये नाही.संकल्प एज्युकेशन फाऊंडेशन याच विषयावर गडचिरोली जिल्ह्यात काम करीत आहे. ग्रामीण भागातील मुलांपर्यंत आधुनिक काळातील विविध संधी आणि त्याचे मार्ग याची माहिती पोहोचवणे आणि त्याकरिता प्रत्यक्ष मदत करणे असे संकल्पच्या कामाचे स्वरूप आहे. या कार्यशाळेत मुलांना वाणिज्य शाखेतील उच्च शिक्षणाच्या संधी,उच्च शिक्षणाची गरज, विविध क्षेत्रातील फेलोशिप,सध्यस्थितीत सुरू असलेल्या फेलोशिप, त्यासाठीच्या प्रक्रिया या विषयाच्या अनुषंगाने संकल्पचे अध्यक्ष डॉ.पंकज नरूले, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी श्री.अमित पुंडे,संकल्पचे सदस्य चेतना लाटकर,सुश्मिता हेपटे,पुनीत मातकर,कौशिका राकेश या टिमने विद्यार्थ्यांशी संवाद साधत शंका समाधान केले. युवांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. या कार्यशाळेला प्रामुख्याने नेहरू युवा केंद्राच्या तालुका समन्वयक कल्याणी गायकवाड आणि प्रा. सदावर्ते उपस्थित होते. उच्च शिक्षण आणि फेलोशिप याबाबत संकल्पशी संपर्क साधण्याचे आवाहन याप्रसंगी डॉ.पंकज नरूले यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले.