दि. १२.०४.२०२३
Vidarbha News India
महिना उलटला तरी आंदाेलन कायम; लाेहखाणीला ताेडगट्टा परिसरातील नागरिकांचा विराेध
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/ एटापल्ली : ग्रामसभेची परवानगी न घेता लोह खाणीला परवानगी देण्यात आली. तसेच रस्त्याचेही काम सुरू आहे, याला ग्रामसभेचा विराेध आहे.
त्यासाठी तालुका मुख्यालय एटापल्लीपासून तब्बल ६० कि.मी अंतरावर नक्षलग्रस्त भाग समजल्या जाणाऱ्या छत्तीसगड सीमेलगत असलेल्या तोडगट्टा गावात ११ मार्चपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही आंदोलन सुरूच आहे. आंदोलन म्हटले की, आठ-पंधरा दिवस खूप झाले. परंतु तोडगट्टा येथील आंदोलन तब्बल एक महिन्यापासून सुरू आहे.
आंदोलनस्थळी दररोज पाचशेच्यावर नागरिकांची उपस्थिती असते. यात महिला, पुरुष, युवक, युवती यांचा सहभाग असतो. आंदोलनात सामील होण्याकरिता काही नागरिक जवळच्या गावातून पायी येतात, त्यांच्या हातात काठी असते. आंदोलनकर्ते दोन-तीन दिवस मुक्कामी असतात व स्वयंसेवकाचे काम करतात. नंतर दुसऱ्या गावातील नागरिक आंदोलनात सहभागी होतात. दिवसभर मार्गदर्शन करतात. एटापल्ली येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुल्लुरवार यांनी रविवारला आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
आंदाेलनाची प्रशासन व लाेकप्रतिनिधींनी फारशी दखल घेतली नसली, तरी लाेह खदानीला स्थानिक नागरिकांचा किती विराेध आहे, हे त्यावरून दिसून येते. लाेहखदान झाल्यास स्थानिक नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागणार आहे. तेथील नागरिकांच्या नशिबी केवळ प्रदूषण येणार, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच विराेध केला जात आहे.