दि. ०६.०४.२०२३
Vidarbha News India
Maharashtra Weather Update :
भर उन्हाळ्यात पावसाचे सावट! हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
विदर्भ न्यूज इंडिया
Maharashtra Weather Update : राज्यात दिवासा उन्हाच्या झळा बसत असताना हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी राजा पुन्हा चिंतेत पडला आहे.
राज्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे. या जिल्ह्यांना ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये ६ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच ७ एप्रिल रोजी विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ६ एप्रिल म्हणजे आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये राहणारे शेतकरी तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.