दि. १८.०४.२०२३
Vidarbha News India
Naxalite Arrested : गडचिरोली पोलिस दलाने जहाल नक्षलवाद्यास केली अटक
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाने नक्षल चळवळीचे कंबरडे मोडतानाच एका जहाल नक्षलवाद्यास केली अटक
गडचिरोली पोलिस दलाने नक्षल चळवळीचे कंबरडे मोडतानाच एका जहाल नक्षलवाद्यास मंगळवार आज (दि.१८)अटक केली. साधू उर्फ काल्या उर्फ संजय नरोटे (वय ३१) रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, असे अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, सोमवार (ता. १७) मिळालेल्या गोपनीय खबरीच्या आधारे गट्टा (जांभिया) पोलिस मदत केंद्र हद्दीतील हाचबोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान व पोलिस मदत केंद्राचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षलीवादी साधू उर्फ काल्या उर्फ संजय नरोटे याला अटक केली. तो सन २०१५ पासून गट्टा दलममध्ये भरती होऊन सदस्य पदावर कार्यरत होता.
२८ मार्च २०२३ रोजी तो नक्षल दलम सोडून घरूनच कारवाया करत होता. त्याच्यावर पोलिस पथकावर अॅम्ब्युश (सापळा) लावणे, जाळपोळ करणे, पोलिस व निष्पाप नागरीकांना जिवे ठार मारणे, दरोडा आदी गंभीर स्वरूपाचे २३ गुन्हे दाखल आहेत. त्यात १२ चकमक, २ पोलिस जवानांसह एकूण ८ खुन, २ जाळपोळ व १ दरोडा यांचा समावेश आहे. त्याचा धुळेपल्ली २०२०, कोदुर-२०२०, टेकामेडा-२०२१, गोरगुट्टा-२०२१, गुंडरवाही अॅम्ब्युश- २०२० या चकमकींमध्ये सहभाग होता. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ६७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान)अनुज तारे. अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पार पडली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन पत्रकार परिषदेतून केले आहे.
आता उरले ९४...
एकेकाळी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात रक्तरंजीत भयाचे साम्राज्य निर्माण करणारी नक्षलवादी चळवळ खिळखिळी झाली असून आता जिल्ह्यात अवघे ९४ नक्षलवादी उरल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. या ९४ पैकी ४८ टक्के नक्षलवादी बाहेरचे म्हणजे परराज्यातील आहेत. या नक्षलवाद्यांचे निर्मूलन करण्यासाठी सरकारकडे सी- ६० दल, विशेष नक्षलविराेधी अभियान दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ, स्थानिक पोलिस व इतर बटालियन मिळून तब्बल १२ हजारहून अधिक पोलिस आहेत. मागील तीन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातून एकही नक्षल भरती झाली नसल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.