दि. २४.०४.२०२३
Vidarbha News India
लग्नसोहळ्याहून परतताना भरधाव कार आदळली झाडावर, चिमुकल्याचा मृत्यू
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : नातेवाइकाच्या लग्नसमारंभाहून परतताना भरधाव कार झाडावर आदळली. यात तीन वर्षांचा चिमुकला गतप्राण झाला, सुदैवाने कुटुंब बचावले.
ही घटना देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कासवी फाट्याजवळ २३ एप्रिलला दुपारी साडेतीन वाजता घडली.
प्रमोद शरद डुंबरे (४०), दीक्षा प्रमोद डुंबरे (३७, रा. वैराग) हे मुलगा शिवांश (६) व दुर्गांश (३) यांच्यासह कारमधून नातेवाइकाच्या लग्नासाठी बुद्धेवाडा (ता. अर्जुनी, जि. गोंदिया) येथे गेले होते. लग्न झाल्यावर ते गावी परतत होते. दुपारी साडेतीन वाजता त्यांची कार देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कासवी फाट्याजवळ आली. यावेळी प्रमोद यांचा कारवरील ताबा सुटला. त्यानंतर कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. यात चौघेही जखमी झाले. त्यांना आरमोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून दुर्गांशला मृत घोषित केले. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
