दि. ०३.०५.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या, पतीचा बनाव उघड..!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : लग्नाला अवघे चार महिने होत नाहीत तोच चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे घडली.
चार महिन्यांपूर्वी श्रीनगर येथील महानंद सरकार याचा विवाह चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर येथील खुशी नामक (१८ वर्षीय) युवतीशी झाला. मात्र, महानंद हा खुशीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत होता. २९ एप्रिलला त्याने पत्नी खुशी हिला शेतातील विहिरीत ढकलले. त्यानंतर त्याने विहिरीत एक किलो कीटकनाशकही टाकले. यामुळे खुशीचा मृत्यू झाला. शिवाय अनेक मासेही मृत्युमुखी पडले.
परंतु महानंदने नाट्य रचले. २९ एप्रिलला पत्नी खुशी ही अचानक घरुन निघून गेल्याची तक्रार त्याने मुलचेरा पोलिस ठाण्यात केली.
तिसऱ्याच दिवशी १ मे रोजी महानंदने स्वत:च्या शेतातील विहिरीत खुशीचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी विहिरीची पाहणी केली असता, त्यात अनेक मासेही मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी महानंद सरकार यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. तेव्हा आपणच खुशीला विहिरीत ढकलून कीटकनाशकही टाकल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्यास खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.