दि. १९.०५.२०२३
Vidarbha News India
'शासन आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार सर्व प्रकारचे दाखले - गोविंद शिंदे
विदर्भ न्यूज इंडिया
पुणे : आंबेगाव व जुन्नर तालुक्यांत शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ९वी ते इयत्ता १२ वी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे दाखले शुक्रवार (ता.१९) ते सोमवार (ता. २२) या कालावधीत शाळेतच मिळण्याची व्यवस्था केली आहे.' अशी माहिती जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात बुधवारी (ता. १७) झालेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत शिंदे बोलत होते. यावेळी जुन्नरचे तहसिलदार रविंद्र सबनीस, आंबेगावचे प्रभारी तहसिलदार आनंता गवारी, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे, नायब तहसिलदार सचिन वाघ, शांताराम किरवे, सविता माळी, अनिता शिंदे, गजानन पुरी, संचिता अभंग उपस्थित होत्या.
शिंदे म्हणाले, 'शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन त्यासोबत योग्य पुरावे जोडावेत. तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत तातडीने वय, अधिवास व राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलेयर,जातीचे, उत्पन्नाचे, रहिवासी, एस ई सी, डोंगरी, शेतकरी, अल्पभूधारक आदी दाखले तसेच १८ वय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मतदार नाव नोंदणी होईल.
मुख्याध्यापक,प्राचार्य,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ई महा सेवा केंद्र संचालक, तलाठी यांच्या मदतीने शाळेत सर्व प्रकारचे दाखले महाशिबिराद्वारे उपलब्ध होतील.
प्राचार्य अशोक वळसे पाटील, प्राचार्य उत्तम आवारी, तबाजी वागदरे, अशोक काकडे, साहेबराव शिंदे, यादव, चासकर यांनी चर्चेत भाग घेतला.