दि. ३०.०६.२०२३
Vidarbha News India
नागपूर : ५० रुपयांच्या नादात गमावले ३ लाख; सायबर गुन्हेगाराने दुकानदाराला गंडविल..!
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : ऑनलाईन टास्कमधून ५० रुपये मिळविण्याच्या नादात एका दुकानदाराने चक्क ३ लाख रुपये गमावले. एका लाईकसाठी ५० रुपये मिळतील असे आमिष सायबर गुन्हेगाराने दिले. आमिषाला बळी पडत सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकले.
या प्रकरणी दुकानदाराच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
सायबर गुन्हेगारांनी त यू ट्यूबर लाईक करण्याचे आणि चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवितात. भोळे भाबळे लोक सहज त्यांच्या जाळ्यात अडकतात. विशेष ज्यांना लालसा आणि भीती आहे, अशा लोकांना हेरून त्यांचे बँक खाते रीकामे करतात. गोरेवाडा येथील रहिवासी फिर्यादी अंकीत बदानी (२९) यांचे फुटवेअरचे दुकान आहे.
२३ जून रोजी ते दुकानात असताना आरोपीने व्हॉट्सअॅपवर मॅसेज केला. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून स्क्रीन शॉट पाठविल्यास प्रत्येक लाईकला ५० रुपये मिळतील अशी ऑफर दिली. मुदतीच्याआत दिलेले काम पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवित अंकीतचा विश्वास संपादन केला. त्यांच्या आमिषला बळी पडला. अंकीत जाळ्यात अडकताच कामाला सुरूवात झाली.
सुरूवातीला आरोपीने दिलेला शब्द पाळला, म्हणजे प्रत्येक लाईकसाठी ५० रुपये अंकीतला दिले. कुठलेही श्रम न करता पैसे मिळत असल्याने अंकीतला शंका घेण्याचे काहीच कारण नव्हते. हा प्रकार दोन दिवस चालला. दरम्यान आरोपीने मोठी रक्कम गुंतविण्यास सांगितले. जास्त रक्कम गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, त्यामुळे अंकीतने जास्त रक्कम गुंतविली. तिसऱ्या दिवशी म्हणजे २६ जूनला त्याने लाखो रुपये लावले. ३ लाख ७ हजार रुपये गुंतविताच आरोपीने मोबाईलचा खेळ बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.