दि.०८.०६.२०२३
गोंडवाना विद्यापीठाचा 'विद्यापीठ आपल्या गावात' उपक्रम तज्ञांच्या मार्गदर्शनात सुरू
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली सारख्या आदिवासीं बहुल जिल्ह्यात पूर्णकलिन महाविद्यालया शिवाय दर्जेदार पदवी शिक्षण कसे देता येईल? तेही गावातील लोकांचा व्यवसाय किंवा रोजगार बुडू न देता. याचा शोध घेत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रंशात बोकारे यांच्या संकल्पनेतून एक आगळा - वेगळा उपक्रम सुरू झाला विद्यापीठ आपल्या गावात. रात्री ६ ते ९ या वेळेत विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन तज्ञ प्राध्यापक वर्ग घेत आहेत. या अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ आर्ट्स ची पदवी दिली जाणार आहे.हा उपक्रम राबविणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पाहिलं विद्यापीठ आहे.
गोंडवाना विद्यापीठ नाविन्याचा ध्यास घेत आपल्या अभिनव उपक्रमांनी गडचिरोली सारख्या संवेदनशील जिल्ह्यातल्या दुर्गम गावात आधुनिक ज्ञानाच्या समृद्ध गंगेचा प्रवाह वाहावत आहे. कमावत्या माणसाचं कौशल्य वृद्धिंगत करणे आणि नव्या माणसांना कमावण्या योग्य बनविणे हा यामागचा उद्देश आहे. याच उद्देशाला घेउन कुलगुरू प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू आहे.
आदिवासींची अलम दुनिया बदलावी म्हणुन
गडचिरोली जिल्ह्याला बांबुच्या जंगलाचा समृद्ध वारसा लाभला आहे. इथला बांबु अत्यंत उत्कृष्ठ दर्जाचा असल्याचे मानल्या जातो. इतक्यातच तो मर्यादित झालाय. बांबूच्या कलाकुसरीचे उपजत ज्ञान आणि जाण सुध्दा इथल्या आदिवासीं समुदायात आहे. त्यांच्या याच उपजत कौशल्याला आधुनिक ज्ञान आणि कौशल्याची जोड देऊन त्यांना कुशल कारागीर, व्यवसायीक आणि उद्योजक म्हणुन सन्मानाने उभे करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ पुढें सरसावले आहे. त्यामुळेच बीए कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात बांबू क्रॉफ्ट चा जाणीवपूर्वक सामावेश केलाय. बांबू हे फ्युचर मटेरियल असुन यातुन पदवी शिक्षण अर्ध्यावर सोडलेल्यांचे फ्युचर कसे बनविता येईल यातुन हा प्रयोग साकार झाला आहे.
जगप्रसिध्द तज्ञ पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या दारी
मार्च महिन्यात ज्यांना इंग्लंड देशाच्या संसदेत शी इंसपिरेस पुरस्कार देण्यात आला. अश्या जगप्रसिद्ध बांबू प्रशीक्षक पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचल्या आहेत. गेल्या ६ वर्षात ३ राज्यातल्या ११०० हून अधिक आदिवासीं-वंचीत महिलांना ज्यांनी प्रयोगशील बांबु कलेचे धडे दिले. अश्या "द बांबु लेडी ऑफ महाराष्ट्र" मीनाक्षी मुकेश वाळके जांभळी गावात विद्यापीठ आपल्या गावात उपक्रमा अंतर्गत बांबू डिझाईनिगचे प्रशिक्षण देण्यासाठी सेवारत झाल्या आहेत. बांबू डिझाईन मध्ये ५ नवे प्रयोग, बांबु क्युआर कोड स्कॅनर हा देशातील पहिला मॉडेल साकारणाऱ्या मीनाक्षी वाळके यांनी जगभर बांबू राखी लोकप्रिय केली आहे.
काय आहे विद्यापीठ आपल्या गावात उपक्रम
गोंडवाना विद्यापीठाद्वारे उन्नत भारत अभियाना अंतर्गत आदर्श पदवी महाविद्यालयाव्दारे आयोजित 'विद्यापीठ आपल्या गावात' या उपक्रमाच्या माध्यमातून जांभळी या ग्रामपंचायतीमध्ये महाविद्यालय सोडलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून २२ विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात आली आणि त्या विद्यार्थ्यांना बी. ए. या पदवी अभ्यासक्रमामध्ये पुनरप्रवेशीत करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
कोणते अभ्यासक्रम शिकवले जातात
विविध कारणामुळे महाविद्यालय सोडून दिलेल्या विविध रोजीचे काम करणाऱ्या तरुण तरुणीसाठी गोंडवाना विद्यापीठ प्रत्यक्ष गावामध्ये जाऊ रात्रकालीन महाविद्यालय भरवते आणि त्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख होण्याकरिता सक्षम करण्याचं प्रयत्न करत आहे.यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय नवीन अशा स्वरूपाचे अभ्यासक्रम गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेजने तयार केले यामध्ये इतिहास, वनव्यवस्थापन, वन उपज, बांबू हस्तकला, रानभाजी अशा पाच विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातील इतिहास या विषयात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास व प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून अध्ययन करण्याचे सुप्त कार्य समाविष्ट करण्यात आलेले आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा हा वनांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. वनामध्ये राहून स्वतःचे उदरनिर्वाह प्रस्थापित करता यावे व वन हेच या जीवनाचे साधक बनावे याकरिता वनव्यवस्थापनाची जोड या अभ्यासक्रमामध्ये देण्यात आली तसेच या वनातून जे वन उपज मोठ्या मुबलकतेने उपलब्ध आहेत त्या वन उपजाचे सुद्धा व्यवस्थापन तिसऱ्या विषयामध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. संपूर्ण भारतभर गडचिरोली जिल्ह्यातून बांबूची निर्यात केली जाते या बांबूंपासून हस्तकलेची निर्मिती झाली तर त्याची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ शकतं हेच डोळ्यासमोर ठेवून या महाविद्यालयातून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना हस्तकलेची आवड निर्माण व्हावी व रोजगार निर्मिती करता यावी म्हणून बांबू हस्तकला बांबू क्राफ्ट या विषयाचा समावेश करण्यात आला. गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात असलेलं वन आणि त्या वनात अतिशय चवदार असणाऱ्या व पौष्टिक असणाऱ्या रानभाज्या यांची माहिती प्रचिती व त्यांच्या गुणसत्त्वांची जनजागृती व्हावी व या रानभाजी प्रवर्गाला मोठ्या प्रमाणात मागणी प्रस्थापित करता यावी या अतिशय व्यापक उद्देशाने रानभाजी या विषयाची निर्मिती अभ्यासक्रमामध्ये करण्यात आली. या पाच पेपरच्या माध्यमातून विद्यापीठ आपल्या गावात या उपक्रमामध्ये सर्वात प्रथम जांभळी या गावात अतिशय सुंदर प्रतिसाद युवकांच्या माध्यमातून मिळतो आहे दररोज विद्यापीठ परिसरातले तज्ञ प्राध्यापक हे विद्यापीठाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनाने संध्याकाळी त्या गावात जातात नियमित यथोचित वर्ग भरून तासिका घेतात आणि त्याच वाहनाने उशिरा रात्रीपर्यंत परत येतात महिला प्राध्यापिका असेल तर त्यांच्यासोबत महिला सुरक्षारक्षक गार्ड सुद्धा विद्यापीठाच्या सहकार्याने महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेला आहे. या माध्यमातून २७ मार्च २०२३ रोजी गोंडवाना विद्यापिठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक देवाची तोफा यांच्या उपस्थितीमध्ये या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली. या अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रमात विद्यापीठाच्या परिसरातील अनेक तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक व अनेक विषयाचे प्राध्यापक स्वयंसेवी तत्त्वावर कार्यकरणास स्वतःहून समोर आलेले आहेत हे विशेष या उपक्रमात भविष्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शंभर गावांचा उद्देश ठेवून उपक्रमाची व्यापकता वाढणार आहे त्या दृष्टीने अनेक ग्रामपंचायतीतून मागणी सुद्धा येऊ लागलेली आहे.