दि. २६.०६.२०२३
Vidarbha News India
येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण देशभर व्यापणार..!
विदर्भ न्यूज इंडिया
यंदाच्या मान्सून आगमनामध्ये असामान्य बदल झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मान्सून भारतात दोन शाखेच्या माध्यमातून दाखल होतो. सर्वसामान्या नैऋत्य मान्सून अरबी समुद्रातून भारतातील केरळात सर्वप्रथम दाखल होतो, यंदा मात्र मान्सून बंगालच्या उपसागरातून दुसऱ्या शाखेमार्फत पूर्वेकडील राज्यांमधून भारतात दाखल झाला आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये असामान्य बदल झाला असून, देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई या दोन्ही भागात येत्या ४८ तासात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांत सोमवारी (दि.२६ जून) आणि मंगळवारी (दि.२७ जून) या पुढच्या दोन दिवस एकाचवेळी मुसळधार (Monsoon Update Live) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
साधारणपणे मान्सून दिल्लीच्या तुलनेत मुंबईत लवकर पोहोचतो. मात्र यंदा अरबी समुद्रात मान्सून कमकुवत झाल्यामुळे तो बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडील राज्यांमधून भारतात सर्वप्रथम दाखल झाला आहे. त्यामुळे मान्सून दिल्ली आणि मुंबईत जवळपास एकाच वेळी पोहोचला आहे, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
Monsoon Update Live: सामान्य मान्सून बदलाचे 'हे' आहे कारण
हवामानशास्त्रज्ञांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, चक्रीवादळ बिपरजॉयमुळे यंदाच्या मान्सूनमध्ये असामान्य बदल झाला आहे. बिपरजॉय वादळ १५ जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले होते. बिपरजॉयमुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची प्रगती मंदावली. भारतातील मान्सून देशाला दोन दिशांनी व्यापतो, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. एक अरबी समुद्रापासून देशाच्या पश्चिम भागापर्यंत आणि दुसरा बंगालच्या उपसागरापासून देशाच्या पूर्वेकडील भागांपर्यंत. यं
दा बिपरजॉयमुळे अरबी समुद्रातून पश्चिमेकडील राज्यांत पोहोचणारा मान्सून लांबला. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातून तयार झालेला मान्सून पूर्वेकडील राज्यांमध्ये वेळेवर पोहोचला. यामुळेच यंदा मान्सून असामान्य होता आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये मान्सूनच्या पावसाने पहिल्यांदा हजेरी लावली, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पुढील दोन दिवसात मान्सून देश व्यापणार- डॉ. मृत्युंजय मोहापात्रा
नैऋत्य मान्सून देशातील बहुतांश भागात सक्रीय झाला आहे. देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मूच्या काही भागातही मान्सून दाखल झाला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र देखील मान्सूनने व्यापला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून आणखी पुढे सरकेल आणि देशातील इतर भाग देखील व्यापेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे संचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे.