दि. १७.०६.२०२३
Vidarbha News India
Nagpur News | नागपुरात आहे विदर्भातील सगळ्यात मोठं फुलांचं मार्केट, दिवसाला 'इतक्या' लाखांची होते उलाढाल
नागपुरात नेताजी फुल मार्केटमध्ये आजघडीला 70-80 व्यापारी आहेत. तर शहरात लहान मोठे असे 2 हजारहून अधिक किरकोळ फुल विक्रेते आहेत. शेतकऱ्यांना देखील जोड धंदा आणि फुल उत्पादनातून चांगला नफा मिळत असतो.
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर: नागपुरात (Nagpur News) विदर्भातील सर्वात मोठे फुलांचे मार्केट (Nagpur Flower Market) असून आजच्या घडीला या ठिकाणी 70-80 व्यापारी आहेत. येथील रोजची उलाढाल 40 लाखांच्या घरात आहे. लग्न सामारंभ असो की धार्मिक पूजाविधी अथवा कुठला सण- उत्सव यासाठी हमखास फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते. नागपूर येथील सीताबर्डी भागात फार जुनी आणि मोठी फुलांची बाजारपेठ आहे. नेताजी फुल मार्केट (Netaji Flower Market) हे विदर्भातील सर्वात मोठे मार्केट आहे. या बाजारपेठेमध्ये दिवसाला लाखोंची उलाढाल होत असून शेतकरी ते किरकोळ फुल विक्रेत्यांसाठी या बाजारपेठेचे महत्व आहे. या ठिकाणी दररोज विदर्भासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक आणि जावाक होत असते.
फुलांची जुनी बाजारपेठ
सीताबर्डी येथील नेताजी फुल मार्केट 1994 पासून भरत आहे. नागपूर, विदर्भासह लगतच्या राज्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही एक उत्तम बाजारपेठ आहे. या ठिकाणी विदर्भासह नाशिक, पुणे, अहमदनगर तर इतर राज्यातील भोपाळ, बेंगलोर, हैदराबाद येथून फुलांची आवक होत असते. लगतच्या राज्यातील छत्तीसगड मध्यप्रदेश, तेलंगणा येथून देखील फुलांची आवक जावक होत असते. शेतकऱ्यांना फुलांच्या उत्पादनातून जवळ जवळ एक एकरामागे 50 हजार रुपयांचा नफा या बाजारातून मिळत असतो, अशी माहिती नेताजी फुल मार्केट ठोक आणि चिल्लर फुल विक्री संघाचे अध्यक्ष विजय वंजारी यांनी दिली.
दिवसाला होते 30-40 लाखांची उलाढाल
नेताजी फुल मार्केटमध्ये आजघडीला 70-80 व्यापारी आहेत. तर शहरात लहान मोठे असे 2 हजारहून अधिक किरकोळ फुल विक्रेते आहेत. शेतकऱ्यांना देखील जोड धंदा आणि फुल उत्पादनातून चांगला नफा मिळत असतो. दररोज या बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक आणि जावक होत असते. दिवसाकाठी या ठिकाणी जवळ जवळ 30-40 लाख रुपयांची उलाढाल होत असते. तर दिवाळी, दसरा, गणेश उत्सव या सणांच्या दिवसात हीच आकडेवारी 1 ते 1.50 करोड रुपयांपर्यंत जाते, अशी माहिती देखील वंजारी यांनी दिली आहे.
सजावटीच्या फुलांना उन्हाळ्यात मागणी
हल्ली लग्नसराईचे दिवस असल्याने सजावटीच्या फुलांना उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. त्यासाठी लागणारे जरबेरा, डच गुलाब, कार्नेशन, आर्किड, निलियममध्ये आशियाटिक, ओरिएन्टल, जिप्सोफिलिया, गोल्डन रॉड या फुलांना उन्हाळ्यात जास्त मागणी असते. ही फुले स्थानिक उत्पादकांसह बंगळुरू येथून सीताबर्डी नेताजी फूल मार्केटमध्ये विक्रीसाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही विक्रेते नोंदणी करूनच फुलांची विक्रीसाठी मागणी करीत असल्याची माहिती येथील फुल विक्रेत्यांनी दिली.
नेताजी फूल मार्केटचा व्हावा विकास
सन 1994 पासून या ठिकाणी हा फुल बाजार भरत आला आहे. ही सर्वांच्याच दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाजारपेठ आहे. मात्र या बाजारपेठच्या विकासाची मागणी गेली कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी आम्ही शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने फूल उत्पादक शेतकरी व व्यापारी या फूल मार्केटच्या विकासाच्या प्रतीक्षेत आहे, असे खरेदी विक्री संघाचे सचिव राजन येळणे यांनी सांगितले.