मुख्यमंत्रिपदासाठी पसंतीची जाहिरात, भाजप-शिवसेनेत मिठाचा खडा..! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

मुख्यमंत्रिपदासाठी पसंतीची जाहिरात, भाजप-शिवसेनेत मिठाचा खडा..!

दि. 14.06.2023

Vidarbha News India

मुख्यमंत्रिपदासाठी पसंतीची जाहिरात, भाजप-शिवसेनेत मिठाचा खडा..!

विदर्भ न्यूज इंडिया

मुबंई : वृत्तपत्रात आलेल्या एका जाहिरातीमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मिठाचा खडा पडला आहे. एका सर्वेक्षणाचा आधार घेत एकनाथ शिंदे यांचा उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

इतकेच नाही, तर राज्यातील जनतेने पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना जास्त, तर देवेंद्र फडणवीस यांना कमी टक्के पसंती दिल्याचा उल्लेखही या जाहिरातीत आहे. या जाहिरातीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच फोटो असून, 'राष्ट्रामध्ये मोदी, तर महाराष्ट्रात शिंदे' असा उल्लेख आहे. या जाहिरातीमुळे भाजपमध्ये नाराजी पसरल्याचे मानण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी कोणतीही नाराजी नसून राज्याला पुढे नेत सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी आणि देवेंद्र फडणवीस करीत आहोत, असे स्पष्ट केले आहे.

'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा मथळ्याखाली मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे, असेही यात म्हटले आहे. संदर्भासाठी एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणाचा दाखला यासाठी देण्यात आला आहे. भाजपला ३०.२ टक्के आणि शिवसेनेला १६.२ टक्के जनतेने दिलेला कौल म्हणजेच राज्यातील ४६.४ टक्के जनता भाजप-शिवसेनेला राज्यात पुन्हा सत्तेवर आणण्यास इच्छुक आहे, असे या जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातच पुढे एकनाथ शिंदे यांना राज्यातील २६.१ टक्के जनतेला मुख्यमंत्रिपदी पुन्हा पाहण्याची इच्छा आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के जनतेला मुख्यमंत्रिपदी पहायची इच्छा असल्याचे यात म्हटले आहे. या जाहिरातीमुळे दिवसभर राजकीय गदारोळ माजला. भाजपमध्ये या जाहिरातीमुळे नाराजीची लहर निर्माण झाल्याचे मानण्यात येत आहे. त्यातच मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळ बैठकीनंतर एकत्रच कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, नाराज असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी जाणे टाळले. त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्र्यांसोबत पाठविले. मात्र, नंतर देवेंद्र फडणवीस हे नाराज नाहीत तर त्यांना कानाचा व सायनसचा त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना तीन दिवस हवाई प्रवास टाळण्यास सांगितल्यानेच ते कोल्हापूरला गेले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.

राज्याला पुढे नेण्याचा दोघांचाही प्रयत्न -मुख्यमंत्री

''आमचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. शिवसेना-भाजप युती ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित आहे. राज्याला पुढे नेत सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी आणि देवेंद्र फडणवीस करीत आहोत. ही एक वैचारिक युती असून स्वार्थ, खुर्ची आणि मला काहीतरी मिळेल, यासाठी झालेली नाही. म्हणून ही युती भक्कम आहे. शिवसेना-भाजप महायुती लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढत विकासाच्या मुद्द्यावर जिंकू, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी जाहिरातीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.

ती जाहिरात अज्ञात हितचिंतकाकडून -शंभूराज देसाई

''या जाहिरातीशी शिवसेनेचा काडीमात्र संबंध नाही. ही जाहिरात पक्षाच्या कोणत्या तरी हितचिंतकाने दिली आहे, असे स्पष्ट करत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या जाहिरातीबद्दल कानावर हात ठेवले. मात्र, या जाहिरातीतील निष्कर्ष पाहता आमची युती पन्नास टक्क्याच्या पुढे असल्याचेच दिसून येते. आमच्यात पहिल्या-दुसऱ्या नंबरसाठी भांडणे नाहीत. शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार, या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. या बातम्या टेबल स्टोरी आहेत. शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार चांगले काम करते आहे, हे काम असेच करत राहू, असे शंभूराज देसाई म्हणाले.

कानाच्या त्रासामुळेच फडणवीसांचा कोल्हापूर दौरा रद्द -दीपक केसरकर

''उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला जाणार होते. मात्र, त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याचा संबंध या जाहिरातीशी जोडण्यात आला. त्यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, ''सततच्या हवाई प्रवासामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानाला त्रास होत आहे. कानावर दबाव येऊ नये म्हणून हवाई प्रवास करू नका, असे डॉक्टरांनी सांगितल्यानेच इच्छा असूनही त्यांना दौरा रद्द करावा लागल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो नाही -संजय राऊत

कोट्यवधींची जाहिरात ही सरकारी आहे की खासगी, हे आधी सरकारने स्पष्ट करण्याची गरज असल्याचे सांगून संजय राऊत म्हणाले, ''ही जाहिरात जर सरकारी असेल तर भाजपच्या ज्या १०५ आमदारांच्या बळावर शिंदे सेनेने सरकार स्थापले आहे, त्या आमदारांपैकी एकालाही जाहिरातीमध्ये स्थान का दिले नाही, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे यांनीच दिले पाहिजे, असेही म्हणाले.

Share News

copylock

Post Top Ad

-->