दि. २८.०७.२०२३
Vidarbha News India
Maharashtra Monsoon 2023 : राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज ; आजही सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट.!
Maharashtra Weather Update :
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : राज्याच्या काही भागात आजही जोरदार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. तर राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला दिसला.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असून पुर्व भागात हलका पाऊस. नगर जिल्ह्यात फारसा पाऊस नाही. अधून मधून रिमझिम पडतोय. नगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असल्याने धरणातील विसर्ग घटवला. सांगली जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता.
नागपूर आणि परिसरात जोरदार पाऊस पडला. शहरात मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास विजांसह मुसळधार पाऊस पडला. बुलडाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्येही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. तर यवतमाळ, भंडारा, गोंदीया आणि वर्धा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात अनेक भागांमध्ये जोरदार सरी झाल्या.
छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण होते. परभणी, हिंगोली जिल्ह्यात अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात संततधार. रात्रीपासून अनेक भागात भीज पाऊस सुरु होता. जळगाव, धुळे जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर काही भागांमध्ये पावसाच्या सरी पडल्या.
हवामान विभागाने आज राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. कोकणातील रत्नागिरी, रायगड तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिजोरदार ते जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही भागांमध्ये अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे.
तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबई तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यांना काही भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच मराठवड्यातील लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यासोबतच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा आणि गोंदीया या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर राज्याच्या इतर भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.