दि. १०.०७.२०२३
Vidarbha News India
Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत नवी घडामोड; सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर होणार फैसला
Maharashtra News
विदर्भ न्यूज इंडिया
महाराष्ट्र विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या (मंगळवारी, ता. ११ जुलै) सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या पीठासमोर ही सुनावणी चालणार असून नियुक्तीवरील स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे बारा जणांची नावे पाठवली होती. मात्र, कोश्यारी यांनी त्यांना मंजुरी दिली नव्हती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने नवी यादी राज्यपालांना पाठवली होती. मात्र, जुनी यादी रद्द करून नव्या यादीला मंजूर देण्याबाबत आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल झाल होती. त्याची सुनावणी आता उद्या होणार आहे.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ती सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर होईल. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. ती स्थगिती उद्या उठणार की कायम राहणार, याची उत्सुकता राज्यातील नेतेमंडळींपासून सर्वसामान्य नागरिकांना लागलेली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या वेळी सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांची मंजुरीचा होता. कारण, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या १२ जणांच्या नावाला कोश्यारी यांनी शेवटपर्यंत मंजुरीच दिली नव्हती. तसेच, मुख्यमंत्री ठाकरे यांनी खरमरीत भाषेत पत्रही लिहिले होते. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी शेवटपर्यंत महाविकास आघाडीने पाठविलेल्या १२ आमदारांच्या नावाला मंजुरी मिळालीच नाही.
दरम्यान, सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने नवी यादी राज्यपालांकडे पाठविली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच तत्कालीन राज्यपालांनी आधीची यादी परत पाठवली आहे. ते नियमबाह्य आहे, असे सांगत न्याालयात आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने २०२२ मध्ये राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीला स्थगिती दिली होती. त्यावर उद्या चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे.