दि. २३.०७.२०२३
Vidarbha News India
Maharastra Rain : आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, काही भागात पूरस्थिती..!
Maharastra Weather Update
विदर्भ न्यूज इंडिया
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. आजही काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या 5 दिवसात राज्यात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसांची शक्यता आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे.
मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हाततोंडाशी आलेलं पिक डोळ्यादेखत वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. विदर्भात पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
राज्यात कुठे काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात
ठाणे जिल्हा
ठाणे जिल्ह्यात असलेला तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाखालील आणि नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय...तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128 मीटर टीएसडी इतकी आहे. ही पातळी 126 मीटर टीएसडी हून जास्त झालीय..
यवतमाळ
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील अनंतवाडी गावात अडकलेल्या सर्व 110 ग्रामस्थांना महापुरातून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय... SDRFच्या टीमनं हे बचावकार्य यशस्वी केलं. मुसळधार पावसामुळं पैनगंगा, शिप, पूस नदीला पूर आला आणि हे ग्रामस्थ रात्रीपासून अडकून पडले होते. त्यांच्या बचावासाठी हवाई दलाचं हेलिकॉप्टर देखील पाचारण करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 44 हा पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बंद झाला. दुथडी भरुन वाहणा-या पैनगंगा नदीचं पाणी संध्याकाळी पुलाला टेकताच, दोन्ही राज्यांच्या प्रशासनाकडून वाहतूक थांबवण्यात आली. त्यानंतर पाणी पुलावर आल्यानं या मार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या. श्रीनगर ते कन्याकुमारी जोडणारा हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
यवतमाळ शहरात अतिमुसळाधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे, सर्वच भागात नाले तुंबल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरून संसारोपयोगी साहित्यांची नासाडी झाली आहे, बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी चिखल साचलाय..
जळगाव
जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यात नदीनाल्यांना पूर येऊन अनेक गावांना पुराचा विळाखा बसला. तर मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधणखेडा धरणाचा मातीचा बांध फुटल्यानं, अनेक गावांत धरणाचं पाणी शिरून पूरस्थिती निर्माण झाली. तसंच पिकांचेही मोठं नुकसान झालं. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी धरणाची पाहणी करून, प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या.
बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजवलाय... संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातील बहुतांश गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालीय... ओढ्या नाल्यांना पूर आलाय. नद्या आपली पातळी सोडून वाहत आहेत.... शेगाव ते वरवट बकाल या रस्त्यावरील कालखेड गावाला पुरानं वेढलंय.
वाशिम
वाशिमच्या मानोरा तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. बेलोरा गाव, खोराडी नदीचा तर, वरोली, कारखेडा आणि तडप गावाला अरुणावती नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. पुरामुळे गावातील घरांचं आणि शेतीचं अतोनात नुकसान झालंय. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय...