दि. २३.०७.२०२३
Vidarbha News India
Raigad landslide: रायगडमधील इर्शाळवाडी दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू, अद्याप 81 जण बेपत्ता, चौथ्या दिवशीही सुरू राहणार बचावकार्य...
विदर्भ न्यूज इंडिया
रायगड : रायगडमधील इर्शाळवाडीत 19 जुलै राजी दरड कोसळल्याची घटना घडली होती. घटनास्थळी तेव्हापासून मदत व बचावकार्य सुरू आहे. आज बचावकार्याचा चौथा दिवस आहे.
शोध आणि बचाव मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी ढिगाऱ्यातून आणखी पाच मृतदेह सापडल्याने महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वर पोहोचली आहे, असे एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले.
भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली घरे गाडली : शुक्रवारी ज्या चार व्यक्तींचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांची नावे माही मधू तिरकड (32), आशी पांडुरंग (50), भारती मधु भुताबरा (18) आणि किशन तिरकड (27) अशी आहेत. आतापर्यंत सापडलेल्या 27 मृतदेहांपैकी 12 महिला, 10 पुरुष आणि चार मुले आहेत, तर एक व्यक्ती अनोळखी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. गावातील 48 पैकी किमान 17 घरे भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली पूर्ण किंवा अंशत: गाडली गेली.
सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीतील रहिवाशांची भेट घेतली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील भूस्खलन प्रवण भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. फक्त इर्शाळवाडी नाही, तर अशा सर्व परिसरांचे पुनर्वसन जवळपासच्या गावांमध्ये किंवा भागात केले जावे. भूस्खलनग्रस्त भागात राहणाऱ्या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी योजना आखल्याचे सांगितले. या बचाव कार्यात एनडीआरएफच्या 4 तुकड्यांचे 100 जवान, टीडीआरएफचे 80 कामगार, 'इमॅजिका'चे 82 कामगार, सिडकोचे 460 कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी काम करत असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. दरम्यान या दुर्घटनेत वाचलेल्या नागरिकांच्या निवाऱ्यासाठी 60 कंटेनरची सुविधा करण्यात आलेली आहे.
इर्शाळगडावर प्रतिबंधात्मक आदेश लागू-रायगड जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. इर्शाळवाडी येथे मदत आणि बचाव कार्याशी संबंधित लोक आणि पर्यटक आणि ट्रेकर्स व्यतिरिक्त इतर लोकांना जाण्यास मनाई आहे. हे प्रतिबंधात्मक आदेश 23 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. सततचा पाऊस, जोरदार वारा आणि डासांचा धोका यामुळे बचाव पथकाला काम करण्यात अडचणी येत आहेत. मार्ग दलदलीचा बनला असल्याने आणखी दरड कोसळण्याची भीती आहे. रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के म्हणाले, महसूल पथक दुर्घटनेत गमावलेल्या जमिनीचे मूल्यांकन करत आहे. बाधित व्यक्तींना जमीन वाटप करण्याचा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे. दुर्घटनाग्रस्त गावातील लोकांना आधार कार्डसह विविध प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केले जाणार आहे.