दि. २०.०८.२०२३
Vidarbha News India
पोलीस बंदोबस्तात गोंडवाना विद्यापीठाच्या पं. दीनदयाळ उपाध्याय अध्यासन केंद्राचे उद्घाटन; संघटनांचे भरपावसात आंदोलन.!
प्रतिनिधी/गडचिरोली : आदिवासी संघटनांनी दर्शविलेला विरोध बघता (दि.१९) शनिवारी गोंडवाना विद्यापीठात कडेकोट पोलीस बंदोबस्तात पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
नागपूर येथील वक्ते आशुतोष अडोणी यांच्या हस्ते अध्यासन केंद्राचे उद्घाटन झाले. कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अध्यासनाचे केंद्र समन्वयक डॉ. अनिरुद्ध गचके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाबाहेर एकत्र येत विविध संघटनांनी कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गोंडवाना विद्यापीठात पं. दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानववाद या अध्यासनाला आदिवासी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. या विरोधानंतरही १९ ऑगस्टला नियोजित कार्यक्रम होईल अशी भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली होती. दरम्यान, सकाळी ११ वाजता विद्यापीठात अध्यासनाचे उद्घाटन झाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर आदिवासी युवा परिषद व बीआरएसपी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चा विद्यापीठावर धडकला. यावेळी कुलगुरु डाॅ. प्रशांत बोकारे यांच्यासह अधिसभा पदाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करून रोष व्यक्त करण्यात आला. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चात अबालवृद्धांसह महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.
◆ अध्यासनाच्या विरोधात कोण होते?
दरम्यान, या अध्यासनाला विरोध करण्यासाठी आदिवासी आणि आंबेडकरी संघटना, आदिवासी युवा परिषद, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष व बीआरएसपी इत्यादी पक्ष आणि संघटनांनी विद्यापीठासमोर निदर्शने केली. कुलगुरु हटाव, विद्यापीठ बचाव, अशा घोषणा देत दीनदयाळ उपाध्याय अध्यासन रद्द करावे, अशी मागणी संघटनांनी केली. या निदर्शनांमध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. संघटनांचा विरोध लक्षात घेता विद्यापीठापासून बऱ्याच अंतरापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, निमंत्रण पत्रिका असलेल्यांनाच उद्घाटन कार्यक्रमाला प्रवेश देण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्याच्या सांस्कृतिक व शैक्षणिक इतिहासाशी पं. दीनदयाल उपाध्याय यांचा काडीचाही संबंध नाही, त्यांचे कुठले योगदान नाही, पण त्यांच्या नावाने गोंडवाना विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करून विद्यापीठ प्रशासनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार लादण्याचा खटाटोप केला आहे. मात्र, हे कदापि खपवून घेणार नाही. विद्यापीठ आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी आहे, तेथे अशा प्रकारचे छुपे अजेंडे चालणार नाहीत, यास आमचा कायम विरोध राहील.
- रोहिदास राऊत, आंदोलक
◆ कुलगुरुंनी ‘तो’ निर्णय मागे घेतला होता.
विद्यापीठाच्या एकूण कार्यप्रणालीवर आदिवासी नागरिकांमधून तीव्र असंतोष उमटल्याचे दिसून आले. यापूर्वी एका सभागृहात दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यावरुनही आदिवासी संघटनांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतर कुलगुरुंनी हा निर्णय मागे घेतला होता.