दि. २५.०८.२०२३
कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता विभाग व ट्रायसेफ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली नवसंकल्पनांचा शोध घेऊन घडवणार नवउद्योजक...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण जाहीर केले आहे. या माध्यमातून राज्यात स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्मिती करुन त्यातून यशस्वी नवउद्योजक घडविण्यासाठी इन्क्युबेटर्सची स्थापना व विस्तार गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौध्दिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य यासह विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात येत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्याचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अधिकाधिक शासकीय संस्था आणि विद्यार्थ्यांनी https://schemes.msins.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. असे आवाहन ट्रायसेफ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या तर्फे करण्यात येत आहे.
पात्रता काय ?
राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी/विद्यार्थीनी किंवा जास्तीत जास्त ३ विद्यार्थ्यांचा समूह अर्ज करण्यासाठी विद्यार्थी किंवा समूहाकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.
कोणता लाभ व पारितोषिके मिळणार ?
जिल्हास्तरावर १० विजेत्यांना प्रत्येकी १ लाखाचे बीज भांडवल राज्यस्तरांवर १० विजेत्या नवउद्योजकांना प्रत्येकी ५ लाखाचे बिज भांडवल विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम तसेच इतर योजनांचा लाभ शैक्षणिक संस्था आणि जिल्हयांना पारितोषिके मिळणार आहेत.
संस्थांची नोंदणी व संकल्पनांची निवड
शैक्षणिक संस्थांची नोंदणी ३१ ऑगस्ट पर्यंत करता येईल. विद्यार्थ्यांकडून अर्जाची मागणी ३१ ऑगस्ट, संस्थास्तरावर सादरीकरण १५ सप्टेंबर. प्रत्येक संस्थेतील सर्वोत्कृष्ट २ संकल्पनांची निवड १० ते २० सप्टेंबर या कालावधीत होईल.
विशेष पारितोषिके
प्रत्येक जिल्हयातील १० अशा एकूण ३६० नवउद्योजकांना १२ महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम इन्क्युबेशन प्रोग्रामनंतर ३६० संकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण उत्तम १० विजेत्यांना ५ लाखांचे बीज भांडवल दिले जाईल.
जिल्हास्तरीय सादरीकरण व संकल्पनांची निवड
प्रत्येक जिल्हयातील उत्तम १०० संकल्पनांच्या सादरीकरणासाठी निवड केली जाईल. १०० संकल्पनांची प्रशिक्षण कार्यशाळा तसेच संकल्पनांचे जिल्हास्तरावर सादरीकरण. जिल्हास्तरावर सर्वात्कृष्ट १० विजेत्यांची निवड, १० विजेत्यांना १ लाख रुपयांचे बीज भांडवल दिले जाईल.