गडचिरोलीतील वाघाच्या शिकारीच्या रॅकेटचे केंद्र दिल्लीत... निवृत्त वनाधिकारीच निघाला आरोपी! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोलीतील वाघाच्या शिकारीच्या रॅकेटचे केंद्र दिल्लीत... निवृत्त वनाधिकारीच निघाला आरोपी!

दि. ०३.०८.२०२३

Vidarbha News India

Tiger Hunting Racket Exposed: गडचिरोलीतील वाघाच्या शिकारीच्या रॅकेटचे केंद्र दिल्लीत... निवृत्त वनाधिकारीच निघाला आरोपी!

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : गडचिरोली येथे केलेल्या वाघाच्या शिकारीच्या घटनेमुळे करण्यात आलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. तपासादरम्यान वाघ तसेच अन्य प्राण्यांची शिकार करणारे रॅकेट हे केवळ गडचिरोली पुरते नाही, तर देशाच्या विविध भागात सक्रिय असल्याचे समोर आले.

धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट चालवणारा म्होरक्या हा एक सेवानिवृत्त वनाधिकारी असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण रॅकेटचे सूत्र दिल्ली येथे जुळलेले आहे. वनविभागाने या सेवानिवृत्त वनाधिकाऱ्याला अटक केली आहे. मसराम जाखड (वय 81) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला गडचिरोली न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे.

गडचिरोली येथील आंबेशिवणी येथे वाघाची शिकार करण्यात आली होती. आसाम येथे काही आरोपींना ताब्यात घेतले. तेव्हा काही धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार 23 जुलै रोजी वनविभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत गडचिरोली येथील आंबेशिवणी व तेलंगाणा राज्यातील करीमनगर येथून अटक केलेल्या एकूण 13 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. वाघ शिकार प्रकरणी अटक केलेल्या 13 आरोपींना न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यांची रवानगी गडचिरोली येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तपासादरम्यान हे रॅकेट संपूर्ण देशात पसरले असल्याची माहिती समोर आली.

संबंधित व्यक्तींवर वनविभागाद्वारे पाळत : मिळालेल्या माहितीच्या आधारे देशामध्ये इतर ठिकाणी असलेल्या संबंधित व्यक्तींवर वनविभागाद्वारे पाळत ठेवण्यात येत होती. याद्वारे प्राप्त सर्व तांत्रिक माहितीचे कौशल्यपूर्ण विश्लेषण करण्यात आले. या शिकारी टोळीचा एका विशेष व्यक्तीशी आर्थिक संबंध असल्याची बाब निष्पन्न झाली होती. ही व्यक्ती दिल्ली स्थित असल्याने वनविभागाच्या विशेष कृती दल चमूने नवी दिल्ली येथे जाऊन सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. मसराम जाखड नावाच्या व्यक्तीला (वय 81) द्वारका येथून 31 जुलै 2023 रोजी अटक केली. हा आरोपी दिल्ली वनविभागातील निवृत्त वनाधिकारी आहे. मागील बऱ्याच वर्षापासून वाघ शिकाऱ्यांशी त्याने घनिष्ट संबंध ठेवले होते. त्यांच्याकडून आर्थिक लाभ घेत असल्याचा त्याच्यावर संशय होता. परंतु पुराव्याअभावी कोणत्याही यंत्रणेला त्याला अटक करता आले नव्हते. महाराष्ट्र वनविभागाने तांत्रिक तपास करुन आरोपीचे शिकाऱ्यांशी असलेले आर्थिक संबंध उघड केले आहे.

देशातील रॅकेट येणार समोर : तसेच, हा आरोपी अनेक शिकारी टोळ्यांच्या संपर्कात असल्याचे देखील समोर आले. त्यामुळे या माध्यमातून देशाचे विविध भागातील शिकाऱ्यांची माहिती संकलित करुन शिकार रोखण्यास मोठी मदत होणार आहे. आरोपीला जेरबंद करुन गडचिरोली येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याला न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे. आरोपींच्या पुढील तपासातून सावली परिक्षेत्राअंतर्गत वाघांची शिकार झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. याबाबतसुध्दा नव्याने वन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास चंद्रपूर वनविभागाचे चमू व विशेष कृती दल यांच्याद्वारे करण्यात येत आहे.

एकूण 19 आरोपींना अटक : आसाम येथील अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींना देखील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांच्या परवानगीने पुढील दोन दिवसात गुवाहटी येथील कारागृहातुन ताब्यात घेण्यात येणार आहे. आजपर्यंत वाघ शिकार प्रकरणात 19 आरोपींचा समावेश दिसून आला आहे. देशपातळीवर देखील आणखी काही आरोपी असल्याची शक्यता तपासाअंती समोर आली आहे, त्याबाबत देखील पुढील तपास सुरु आहे.

'यांनी' केली कारवाई : वरील सर्व कारवाई प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, महिप गुप्ता यांच्या मार्गदर्शनात ज्योती बॅनर्जी (मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती), डॉ. जितेंद्र रामगावकर (वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प), रमेशकुमार (वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त), रविंद्रसिंह परदेशी (पोलीस अधिक्षक चंद्रपूर), नीलोत्पन (पोलीस अधिक्षक गडचिरोली), कुशाग्र पाठक (उपसंचालक-बफर), नंदकिशोर काळे, उपसंचालक (कोर), मिलीश दत्त शर्मा (उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग), बापू येळे (सहाय्यक वनसंरक्षक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प), सोनल भडके (सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली), आदेशकुमार शेंडगे (सहाय्यक वनसंरक्षक), स्वाती महेशकर (वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर) व गायकवाड, (वनपरिक्षेत्र अधिकारी नागभिड, सायबर सेल) मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आकाश सारडा, मुकेश जावरकर, दिनेश केंद्रे व स्थानिक पोलीस अधिकारी यांच्याद्वारे करण्यात आली आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->