दि. ०१.०८.२०२३
Vidarbha News India
मोठी बातमी! राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवारांकडे सोपवली जबाबदारी
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना दोन आठवडे चालले. मात्र, आता विरोधी पक्षनेता पदासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे गेले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या विरोधी पक्षाने निर्णय घेत विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार तर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक महिन्यापूर्वी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तेव्हापासून राज्याला विरोधी पक्ष नेता कधी मिळणार? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विरोधीपक्ष नेतेपदावरून सत्ताधारी आमदारांकडून विरोधकांना लक्ष्य केले जात होते.
राजकारणात वेगळे अस्तित्व : विदर्भात विजय वडेट्टीवार यांची ओबीसी नेते म्हणून ओळख आहे. विदर्भातील चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील राजकारणात वेगळे अस्तित्व त्यांनी निर्माण केले आहे. विधिमंडळावरील त्यांची ही पाचवी वेळ आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्रीपद होते. यापूर्वी देखील विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. भाजपला सडेतोड उत्तर देण्यासाठी देखील वडेट्टीवार ओळखले जातात. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी पंगा घेतला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली की काय? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारा विदर्भातील काँग्रेसचा नाना पटोलेनंतर दुसरा चेहरा म्हणून वडेट्टीवार यांच्याकडे पाहिले जात होते. त्यानुसार दिल्लीतील काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी विजय वडेट्टीवार यांच्या गळ्यात विरोधी पक्ष नेतेपदाची माळ टाकली आहे.
विरोधीपक्ष नेतेपद कॉंग्रेसकडे : अजित पवार शिंदे फडणवीस सरकारसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यापेक्षा काँग्रेसकडे विधानसभेतील सदस्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ठरल्यानुसार विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस प्रबळ दावेदार होता. विरोधीपक्ष नेतेपद तब्ब्ल चार वर्षानंतर काँग्रेसकडे आले. तसेच दुसऱ्यांदा विजय वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबाबत ट्विट आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.
अंतर्गत गटबाजी थांबवण्याचा प्रयत्न : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पाटील विरुद्ध एक गट सक्रिय झाला होता. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान करून दिल्लीतील काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील अंतर्गत गटबाजी रोखली जाईल का, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.