दि. २७.०८.२०२३
Vidarbha News India
ZP जिल्हा परिषद १९४६० जागांसाठी १४.५१ लाख अर्ज; तिजोरीत १४५ कोटी जमा
- शिक्षक भरती नसल्याने DEd, BEd केलेल्या उमेदवारांचेही अर्ज...
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार ४६० पदांची नोकरभरती होणार आहे. त्यासाठी तब्बल ४१ लाख ५१ हजार उमेदवारांनी अर्ज केले असून एका जागेसाठी सरासरी ७५ उमेदवार स्पर्धेत आहेत.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय विभागांमधील ७५ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू असून आता जिल्हा परिषदांमधील रिक्तपदांसाठी अर्ज मागविले आहेत.
५ ते २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. अर्जांची छाननी होऊन परीक्षा पार पडतील. उमेदवारांची संख्या पाहता एक-दोन दिवसात परीक्षा पार पाडणे अशक्य असल्याने किमान आठ दिवसांत वेगवेगळ्या टप्प्यांवर जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमदेवारांची परीक्षा घेतली जाणार आहे.
तत्पूर्वी, राज्यात सुशिक्षित बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढल्याची वस्तुस्थिती तलाठी भरतीनंतर आता जिल्हा परिषदांच्या भरतीत देखील समोर आली आहे. एका ठिकाणी अपयश आल्यानंतर तोच उमेदवार पुन्हा दुसऱ्या पदासाठी अर्ज करतोय, असे चित्र आहे. त्यामुळे एका उमेदवाराला आठ ते दहा हजार रुपयांचे नुसते अर्जाचे शुल्कच भरावे लागणार आहे.
अर्जाच्या संख्येवरून बेरोजगारीचे दर्शन
खासगी क्षेत्रातील नोकरीपेक्षा शासकीय नोकरीत सुरक्षिततेची हमी आहे. त्यामुळे त्याठिकाणी पगाराची व नोकरीची शाश्वती असल्याने जिल्हा परिषदांमधील गट-क व गट-ड संवर्गातील पदांसाठी बारावी उत्तीर्णची अट असतानाही पदवी, पदव्युत्तर पदवी व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. तलाठी, पोलिस भरतीवेळी देखील अशी वस्तुस्थिती समोर आली होती. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषदांमधील पदभरतीसाठी अवघ्या २० दिवसांत तब्बल साडेचौदा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
शिक्षक भरतीस विलंब, भावी शिक्षक लिपिकासाठी इच्छुक
राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत शिक्षकांची ६० हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात त्यातील ३० हजार पदे भरली जाणार आहेत. आता संचमान्यता पूर्ण झाली असून बिंदुनामावलीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सहा ते सात वर्षांपासून राज्यातील डीएड, बीएड पूर्ण करून टेट, टीईटी उत्तीर्ण झालेल्या दीड ते दोन लाख तरूण-तरूणींना भरतीची आशा आहे. पण, भरती अजूनही प्रत्यक्षात सुरू न झाल्याने तेच उमेदवार आता तलाठी, लिपिक, पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत आहेत.
झेडपी भरतीची सद्य:स्थिती
एकूण जागांची भरती
१९,४६०
उमेदवारांचे अर्ज
१४.५१ लाख
अर्जातून जमा शुल्क
१४५ कोटी
एका जागेसाठी अर्ज
७५