दि. ३०.०९.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : तलावाकाठी एकाचवेळी तीन वाघ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.! बघा व्हिडीओ...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्ह्यातील उत्तर भागात वघांची संख्या वाढली असून दिवसेंदिवस हे वाघ गावाच्या वेशीवर येत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येत आहे. अशात शुक्रवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील वैरागड गावाजवळ तलावाकाठी एकाचवेळी तीन वाघ दिसल्याने या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये तारांबळ उडाली.
देसाईगंज आणि गडचिरोली वनविभागात मागील पाच वर्षांत वाघांची वाढलेली संख्या येथील सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे नागरिकांवर हल्लेदेखील वाढले आहेत. अशात गावानजीक प्रवाशांना किंवा शेतावर जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यालगत वाघ दिसणे नित्याचेच झाले आहे. काही दिवसांपूर्वी देसाईगंज तालुक्यातील फरी येथे एका महिलेचा वघिणीने बळी घेतला होता. त्या वाघिणीला वनविभागाने आठवडाभरातच जेरबंद केले. परंतु वाघांची संख्या वाढल्याने हे वाघ आता गावानजीक येऊ लागले आहेत.
शुक्रवारी रात्री आरमोरी तालुक्यातील वैरागड गावाजवळील तलावाकाठी एकाचवेळी तीन वाघ दिसून आल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सुदैवाने या वाघांनी हल्ला न केल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान, काही नागरिकांनी आपल्याजवळील मोबाईल कॅमेऱ्यात या तीन वाघांना कैद केले असून ही चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात वनविभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
गडचिरोली : जिल्ह्यातील उत्तर भागात वाघांची संख्या वाढली असून अशात शुक्रवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटाच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील वैरागड गावाजवळ तलावाकाठी एकाचवेळी तीन वाघ दिसल्याने या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये तारांबळ उडाली.https://t.co/2jrmCKvB4K pic.twitter.com/whpLPzXpBf
— LoksattaLive (@LoksattaLive) September 30, 2023