दि.०४.०९.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : जंगलात आढळले नक्षल्यांचे शस्त्रसाहित्य, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील ग्यारापत्ती येथील घनदाट जंगलात ३ सप्टेंबरला राज्य राखीव पोलिस दल व ग्यारापत्ती पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानाच्या दरम्यान शस्त्र साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली.
यावेळी पोलिसांनी तीन रायफल जप्त केल्या आहेत.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील ग्यारापत्ती जंगलक्षेत्रात नक्षल्यांची रेलचेल राहिली आहे. तेथे अनेकदा पोलिस व नक्षल्यांत धूमश्चक्री झाल्या आहेत. दरम्यान, ३ सप्टेंबरला राज्य राखीव दलाची तुकडी व ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्राचे जवान गस्त घालत होते. यावेळी जंगलातील एका झोपडीत तीन रायफल आढळून आल्या. या रायफल नक्षल्यांच्या असण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
यावेळी परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबविली, पण नक्षली किंवा अन्य संशयित आढळून आले नाहीत. दरम्यान, अलीकडेच नक्षल्यांचा शहीद सप्ताह पार पडला. मात्र, पोलिसांनी सतर्कता बाळगल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. ग्यारापत्ती जंगलात शस्त्र आढळल्याने पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ही शस्त्रे नेमकी कोणाची, याबाबत तपास सुरू आहे, असे उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी सांगितले.