दि. ०१ सप्टेंबर २०२३
Vidarbha News India
सप्टेंबरमध्ये पावसाची गुड न्यूज, उद्यापासून बरसणार, पहिल्या आठवड्यात पुनरागमनाचा अंदाज
विदर्भ न्यूज इंडिया
मुबंई : ऑगस्ट महिन्यात ओढ दिल्यानंतर सप्टेंबरही कोरडा जाणार, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच हवामान खात्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यासह मध्यात चांगला पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविली आहे.
त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला किंचित का होईना दिलासा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात असून, अवघा महाराष्ट्र आता सप्टेंबरच्या पावसाकडे डोळे लावून बसला आहे.
सप्टेंबरमध्ये सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या महिन्यात जास्त पाऊस पडला तरीही यंदाच्या पावसाळ्याची सरासरी गाठण्याची शक्यता कमीच आहे.
- मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामान खाते
सप्टेंबरच्या मध्यात मध्य, दक्षिण द्विपकल्प, मराठवाडा, कोकण, गोव्यासह मध्य भारतातील काही भागात पाऊस येण्याची शक्यता आहे. ७ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रासाठी किरकोळ पावसाचा अंदाज कायम आहे. १० सप्टेंबरपर्यंत त्यात वाढ होऊ शकते. मुंबईसह कोकण व सह्याद्री घाटमाथ्यावर ३ ते १० सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस हाेईल.
- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान शास्र विभाग
११ ते १४ सप्टेंबरदरम्यानच्या पहिल्या, २५ ते २९ सप्टेंबरदरम्यानच्या दुसऱ्या आणि ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यानच्या तिसऱ्या अशा एकूण तीन पावसांच्या आवर्तनापैकी एखाद्या-दुसऱ्या आवर्तनातून महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता असू शकते
- माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी