दि. ०१.०९.२०२३
गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राचे थाटात उद्घाटन
आदिवासी पुरातन भारतीय संस्कृतीचा भाग आहे; - प्रा. भांग्या भुक्या
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आदिवासींमध्ये मानवी मूल्यांचा मोठा साठा आहे. आदिवासींच्या बोलीभाषा ,त्या भाषांना असणारी लिपी, त्यांची गाणी, संस्कृती ,पेहराव ते कसे इतर समुदायापेक्षा वेगळे आहे. याचा अभ्यास या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करता येईल. आदिवासींची श्रम समूह आणि सहकार्यावर आधारित मूल्य जोपासणारी मानवी संस्कृती जपली पाहिजे. आदिवासी समुदायाचा विकास कसा होईल असा मुख्य प्रवाह या अध्यासन केंद्रातून सगळ्यांनी मिळून तयार करायचा आहे. आदिवासी समाजाची संस्कृती समृद्ध असून तिला जपणे आवश्यक आहे. आदिवासी संस्कृती जीवनाचे अध्ययन करताना ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून अध्ययन होणे गरजेचे आहे.आदिवासी अध्यासन केंद्राद्वारे आदिवासी अधिकार,कायदे,जीमिनीचे अधिकार, सांस्कृतिक वारसा जतन करणे .यावर विशेष भर देऊन विध्यार्थ्यांमध्ये त्यांचा वारसा रुजवणे गरजेचे असून आदिवासी पुरातन भारतीय संस्कृतीचा भाग आहे असे प्रतिपादन आदिवासी अभ्यासक , इतिहास विभाग प्रमुख, केंद्रीय विद्यापीठ,हैद्राबादचे प्रा. भांग्या भुक्या यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राचे उद्घाटन आज पार पडले. त्यावेळी ते उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे ,प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक देवाजी तोफा, प्रमुख उपस्थिती म्हणुन प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन तसेच समन्वयक आदिवासी अध्यासन केंद्र डॉ वैभव मसराम उपस्थित होते.
या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून
बोलताना कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठात आदिवासींच्या संदर्भात जे काम होत होते. त्याला एक नवीन आयाम मिळालेला आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये ज्या प्रकारचे संस्कृती आहे ती विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवता येईल, येणाऱ्या पुढच्या पिढी पर्यंत कशी पोहचवता येईल हाच आमचा प्रयत्न नेहमी राहिलेला आहे. मागच्या सीनेट मध्ये पाच अध्यासन केंद्र मंजूर करून घेतले त्यात हे आदिवासी अध्यासन केंद्र होते. यासाठी प्रत्येक अध्यासन केंद्राला १५ लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे. हे अध्यासन केंद्र या परीक्षेत्रातील लोकांसाठी मार्गदर्शक ठरेल. यासाठी पैशाची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले . या अध्यासन केंद्राच्या उद्घाटनाला नागपूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी ,चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील गणमान्य नागरिक ,समाजसेवक, सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य , विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. वैभव मसराम, ज्ञानस्तोत्र केंद्राच्या संचालक, संचालन डॉ. रजनी वाढई यांनी केले. आणि आभार विद्यार्थी विकास केंद्राच्या संचालक डॉ.प्रिया गेडाम यांनी मानले.