दि. ०२.०९.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : अतिदुर्गम लाहेरीत खाटेची कावड करून छत्तीसगडच्या रुग्णाचा १८ किमी प्रवास
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/लाहेरी : महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील भामरागड या अतिदुर्गम तालुक्यात आरोग्य सुविधांअभावी रुग्णांची परवड सुरूच आहे. १ सप्टेंबरला खाटेची कावड करून छत्तीसगडच्या एका युवतीला १८ किलोमीटर पायपीट करत लाहेरीत उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यामुळे येथील आरोग्यव्यवस्थेच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या भागात आरोग्याच्या पुरेशा सुविधा नसल्याने येथील नागरिक उपचारासाठी नेहमीच भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे येतात. मात्र, रस्ते व पुलांचा अभाव असल्याने जंगलातील पायवाटेने खाटेची कावड करूनच रुग्णांना दवाखान्यापर्यंत आणावे लागते. छत्तीसगड राज्यातील मेटावाडा हे गाव डोंगराळ भागात आहे. या गावातील पुन्नी संतू पुुंगाटी (१७) ही युवती मागील पाच दिवसांपासून तापाने फणफणत होती. त्यामुळे या युवतीला कुटुंबीयांनी खाटेवर टाकून सुमारे १८ किमीचा पायदळ प्रवास करीत लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या भागात रस्ते व पुलांच्या अभावामुळे अनेकांना दवाखान्यापर्यंत येतानाच यातना सहन कराव्या लागतात. या समस्येकडे लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार, हा प्रश्न आहे.
यापूर्वी बाइकवर नेला मृतदेह
दरम्यान, सव्वा महिन्यापूर्वी भामरागड तालुक्यातील दुर्गम कृष्णार भागातील २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने मोटारसायकलवर न्यावा लागला होता. या घटनेने आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते.
या भागात नेटवर्कची अडचण आहे. शिवाय रस्तेही नीट नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचत नाही. या रुग्णाबाबत माहिती मिळाली असती तर रुग्णालयात आणण्यासाठी रुग्णवाहिका पाठवली असती. सध्या उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर आहे.
- डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी.