दि.१३.०९.२०२३
Vidarbha News India
Vidarbha Rain Forecast : पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा...
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : पावसाने उघडीप दिल्याने राज्यात ढगाळ हवामानासह ऊन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरातील पोषक प्रणालींमुळे विदर्भात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत.
आज (ता.१३) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सक्रिय असलेला मॉन्सूनचा आस जैसलमेर, शिवपूरी, रांची, दिघा ते पूर्व - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. नैऋत्य उत्तर प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
त्यापासून बांगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
राज्यात पावसाच्या उघडिपीने उन्हाचा चटका वाढला आहे. ढगाळ हवामानासह उकाड्यामुळे घामटा निघत आहे. आज (ता. १३) पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे.
उर्वरित विदर्भात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कमी दाब क्षेत्राची होतेय निर्मिती
मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. काहीशा दक्षिणेकडे झुकलेल्या या प्रणालीमुळे आज (ता. १३) वायव्य आणि पूर्व - मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली आणखी तीव्र होत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा.