दि. १९.०८.२०२३
Vidarbha News India
शिक्षक भरतीसाठी आतापर्यंत १.५३ लाख उमेदवार, भरती पूर्ण व्हायला नोव्हेंबर येणार...
- १३ जिल्ह्यांचीच बिंदुनामावली अंतिम...
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : राज्यातील ६३ हजार जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये २३ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी सध्या उमेदवारांची नोंदणी सुरु असून आतापर्यंत एक लाख ५३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक पदांची अंतिम केलेली बिंदुनामावली सध्या मागासवर्गीय कक्षाकडून पडताळून घेतली जात आहे. प्रत्येक पदांची पडताळणी करून त्याठिकाणी अंतिम मान्यता दिली जाते. आतापर्यंत राज्यातील १३ जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मान्य झाली असून आगामी आठ दिवसात आणखी सात-आठ जिल्हे त्यात वाढतील. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील भरती प्रक्रिया सुरु होईल.
दरम्यान, नोंदणीनंतर प्रत्येक उमेदवाराला त्यांच्याकडील कागदपत्रे अपलोड करून प्रोफाईल तयार करून घ्यावे लागत आहे. नोंदणी केलेल्या जवळपास ३० हजार उमेदवारांचे प्रोफाईल अद्याप तयार झालेले नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जाहिरातीतील जातप्रवर्गनिहाय उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन मेरिटनुसार भरती होईल. दुसरीकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील एका पदासाठी तिघांची मुलाखत घेतली जाईल आणि ते उमेदवार शालेय शिक्षण विभाग पवित्र पोर्टलवरूनच त्याठिकाणी पाठविणार आहे.
आता नोव्हेंबरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवरील शिक्षक भरती पूर्ण होईल. त्याचवेळी खासगी माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक भरती होणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी, त्या शाळांनी बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेणे आवश्यक आहे.
शिक्षक भरतीची सद्य:स्थिती
स्थानिक संस्थांमधील भरती
२३,०००
उमेदवारांची नोंदणी
१.५३ लाख
नोंदणीची मुदत
२२ सप्टेंबर
बिंदुनामावली पूर्ण
१३ जिल्हे
'माध्यमिक'च्या भरतीला मुहूर्त नाहीच
जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरतीला पहिले प्राधान्य दिले जात आहे. जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून पडताळून घेतली जात आहे. पण, अनुदानित माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमधील भरती प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. बिंदुनामावली अपूर्ण असल्याने खासगी अनुदानित शाळांची भरती लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.