दि. २६.१०.२०२३
Vidarbha News India
Namo Shetkari Yojana: PM मोदींनी बटण दाबलं अन् ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा; तुम्हाला मिळाले का?
Namo Shetkari Yojana Latest News
विदर्भ न्यूज इंडिया
नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचं बटण दाबताच राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्यात नमो किसान महासन्मान निधी योजना सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.
या योजनेसाठी ९५ लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ८६ लाख ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. यासाठी कृषी विभागाने १७२० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.
दरम्यान, अटींची पूर्तता न केल्याने काही शेतकऱ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करुन घ्यावी, असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांना आता वर्षाला १२ हजार रुपये मिळणार
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ६ हजार रुपये अनुदान दिले जाते. आता हे अनुदान १२ हजार होणार आहे. कारण, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला सुरुवात झाली आहे.
राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने ही योजना सुरू केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेसारखाच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पीएम किसान योजना मॉड्यूल महाडीबीटी पोर्टलवर विकसित केले गेले आहे. दरम्यान, आज मोदींनी जरी रिमोटचं बटन दाबलं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम सोमवार पर्यंत जमा होईल अशी माहिती समोर आली आहे.