दि. 17.10.2023
Vidarbha News India
Gadchiroli News : नक्षलवाद्यांना धक्का! बक्षीस जाहीर झालेला जहाल नक्षलवादी अटकेत; गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : नक्षलीविरोधी (Naxal) मोहिमेला सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सरकारने बक्षीस जाहीर केलेल्या जहाल माओवाद्यास अटक करण्यास यश मिळाले आहे. जहाल नक्षलवादी मेस्सो गिल्लू कवडो (Maoist Messo Kavdo) याला सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली आहे.
नक्षलवादी मेस्सो कवडो याच्यावर सरकारने सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस (Gadchiroili Police) आणि केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई करण्यात आली.
जहाल नक्षलवादी नामे मेस्सो गिल्लू कवडो (वय 50) हा जहाल नक्षलवादी एटापल्ली तालुक्यातील रेखाभटाळ या गावातील रहिवासी आहे. हा नक्षलवादी मौजा जाजावंडी-दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर विशेष अभियान पथक, पोलीस पथक आणि सीआरपीएफच्या 191 बटालियन जवानांनी शोध मोहीम राबवली. जवानांच्या या शोध मोहिमेला चांगले यश मिळाले. जंगल परिसरात लपून बसलेला जहाल माओवादी जवानांच्या हाती लागला.
अटक करण्यात आलेला जहाल नक्षलवादी मेस्सो कवडो हा माओवाद्यांच्या सप्लाय टीममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तो नेहमी माओवाद्यांना विविध स्फोटक साहित्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करत होता. त्याला अटक करणे हे गडचिरोली पोलीस दलासाठी महत्त्वाची बाब ठरली आहे. 14 ऑक्टोबर रोजी अटक झालेला जहाल माओवादी डीव्हीसी चैतुराम ऊर्फ सुक्कू वत्ते कोरसा याच्यासोबत काम करत होता. या दोघांना चार दिवसांत अटक केल्याने माओवाद्यांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे.
>> दलममधील कार्यकाळ
- सन 2017 च्या आधी माओवाद्यांना जीवनावश्यक सामान आणून देणे, पोलीस पथक आल्याचे निरोप देणे आदी कामे करत होता.
- सन 2017 ला सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन 2023 पर्यंत कार्यरत
- सन 2023 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन आजपर्यंत कार्यरत
मेस्सोवर कोणते गु्न्हे दाखल
>> चकमक – 2
- नोव्हेंबर-डिसेंबर 2017 मध्ये मुस्फर्शी जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग
- मार्च 2023 मध्ये मौजा मौजा हिक्केर (महाराष्ट्र) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग
>> हत्येचे गुन्हे - 2
- सन 2021-22 मध्ये मध्ये मौजा रामनटोला तह. एटापल्ली जि. गडचिरोली येथे झालेल्या गाव पाटलाच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग असल्याचा आरोप
- सन 2022 मध्ये पुन्हा मौजा दोड्डुर तह. एटापल्ली जि. गडचिरोली येथे झालेल्या गाव पाटलाच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग असल्याचा आरोप.