दि. १६.१०.२०२३
गडचिरोली : आश्रम शाळा ताडगाव येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/भामरागड :भामरागड तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, ताडगाव येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन, थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व विशद करताना लेझिम व बँड च्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांने उत्सुकतेने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तकांची ओळख व्हावी, यासाठी शाळेतील ग्रंथालयाची माहिती देण्यात आली व पुस्तकांचा वापर जास्तीत जास्त करावा असे आव्हान करण्यात आले. यावेळी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे व पुस्तकांचे पूजन मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. 'वाचाल तर वाचाल', 'शिकाल तर टिकाल', 'ज्ञानाची पाहिजे खात्री, तर पुस्तकांशी करा मैत्री' या संकल्पना यावेळी उदाहरणे देऊन स्पष्ट करण्यात आल्या. शिक्षक व विद्यार्थी यांनी पुस्तकांचे वाचन केले.
वाचनालयात नवनवीन पुस्तकांचा समावेश करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी आपल्या वाढदिवसाला चॉकलेट ऐवजी आपल्या नावे शाळेतील वाचनालयाला पुस्तक भेट देतील असे आव्हान मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. धंदर, अधिक्षक श्री. पाझारे, श्री. कटलावर, अधिक्षिका कु. चल्लावर, कु. सिडाम, कु. थोटे, श्री. गजभिये, श्री. तुपट, श्री. सरकार, श्री. जनबंधू, कु. वालदे व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.