दि. २९.१०.२०२३
Vidarbha News India
शिवसेना आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीला वेग, समोर आली मोठी अपडेट !
विदर्भ न्यूज इंडिया
दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीला वेग आला आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीमध्ये राहुल नार्वेकर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत.
30 ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत, या अनुषंगाने वेळापत्रकात काय बदल करायचे? यावर कायदेशीर सल्ला घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
'दिल्लीला दोन-तीन बैठका होत आहेत, त्यासाठी जात आहे. एजी साहेबांनाही भेटणार आहे. पूर्वनियोजित दौऱ्यासाठी चाललो आहे, कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेईन,' असं दिल्लीला जाण्याआधी राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. तसंच राष्ट्रवादीच्या 8 आमदारांना नोटीस आल्याचा प्रश्नही राहुल नार्वेकर यांना विचारण्यात आलं. तेव्हा ही प्रक्रिया आहे, डिस्क्वालिफिकेशन पेटिशन फाईल झाल्यानंतर नोटीस द्यायलाच लागते, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने फटकारलं
16 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मागच्या सुनावणीवेळी सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते, पण सुधारित वेळापत्रक सादर करता न आल्यामुळे सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त करत अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. तसंच सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ देत असताना सुधारित वेळापत्रक सादर करण्याची ही शेवटची संधी असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. या प्रकरणाची सुनावणी आता उद्या म्हणजेच 30 ऑक्टोबरला होणार आहे.