दि. २४.१०.२०२३
Vidarbha News India
आदिवासींच्या हितासाठी आपले योगदान,- सुधीरभाऊ मुनगंटीवार
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आदिवासी समाजाच्या हितासाठी आपल्याला जे-जे योगदान देता येईल, ते-ते देण्याचा आपला प्रयत्न असून त्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण नेहमीच तत्पर असू, अशी ग्वाही वनमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.आदिवासी विद्यार्थी संघ गडचिरोली व जिल्हा गोटूल समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासींचा जिल्हास्तरीय मेळावा दि.२३, सोमवारी गडचिरोली येथील महाराजा सभागृह येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आदिवासी विद्यार्थी संघाचे नंदू नरोटे, डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम, हेमंत बोरकुटे, विलास दशमुखे, रवींद्र ओल्लालवार आदी उपस्थित होते.पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण नेहमीच झटत आलो आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी त्यांना आठ महिने प्रशिक्षण दिल्यानंतर मिशन शौर्य अंतर्गत आदिवासी मुलांनी 29 हजार फुटावरील एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकाविला ही खरच अभिमानाची बाब आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी पायलट व्हावे यासाठी त्यांना आरक्षण देऊन त्यांना प्रशिक्षण दिल्या जात आहे. आता आदिवासी मुले देखील आकाशात उंच भरारी घेऊ शकतील.welfare of tribals शहीद वीर बाबूराव शेडमाके यांच्या नावाने आपण पाठपुरावा करुन पोस्टाचे तिकिट काढले असून आदिवासींना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या हक्काच्या ज्या-ज्या गोष्टी आहेत, त्या मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे मुनगंटीवार म्हणाले.याप्रसंगी आपल्या भाषणातून खासदार अशोक नेते यांनी आदिवासी समाजाच्या अडचणी मांडल्या व त्या सोडविण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घातले. यावेळी आमदार डॉ. होळी यांनी आदिवासी गोटूल समितीमार्फत मुनगंटीवार यांच्याकडे आदिवासी समाजाच्या गोटूल भवनाची मागणी केली. शिवाय या भवनासाठी जागा व निधी देण्यासाठी सुद्धा आग्रह धरला. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची स्पष्टोक्ती याप्रसंगी आमदार होळी यांनी दिली. मेळाव्याला उपस्थित डॉ. नामदेव उसेंडी व कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदू नरोटे यांचेही मार्गदर्शनपर भाषणे झाली.