समाजातील वैचारिक प्रदूषण थांबविण्यासाठी निर्भीड, परखड पत्रकारिता आवश्यक... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

समाजातील वैचारिक प्रदूषण थांबविण्यासाठी निर्भीड, परखड पत्रकारिता आवश्यक...

दि. २८.१०.२०२३
Vidarbha News India 
समाजातील वैचारिक प्रदूषण थांबविण्यासाठी निर्भीड, परखड पत्रकारिता आवश्यक...
- वने , संस्कृतिक कार्यें व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
- ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना कै. काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार प्रदान
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : "हवा प्रदूषण संपवता येईल, जलप्रदूषण थांबवता येईल, माती प्रदूषणावर उपायही शोधता येतील परंतु वर्तमान स्थितीत जे वैचारिक प्रदूषण पसरविण्याचा प्रयत्न होत आहे ही गंभीर बाब असून त्यावरील उपाय किंवा उत्तर हे भाऊ तोरसेकर यांच्यासारखे निर्भीड पत्रकार आहेत असे स्पष्ट करत भाऊ तोरसेकर यांच्या भूमिकेचा सन्मान केल्याबाबत मनापासून आनंद व समाधान होत आहे असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केले.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे आयोजित कै. काकासाहेब पुरंदरे स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभात ना. मुनगंटीवार बोलत होते. आचार्य अत्रे स्मारक समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना यावर्षी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री रामदास आठवले, ग्रामीण विकास मंत्री ना. गिरीश महाजन, मनसे नेते संदीप देशपांडे, अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्ष श्रीमती आरती सदावर्ते -पुरंदरे, भाजपाच्या माहीम विधानसभा प्रमुख अक्षता तेंडुलकर मंचावर उपस्थित होते.
यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, पत्रकारिता या क्षेत्राकडे कधीच व्यवसाय म्हणून बघितले गेले नाही; ते एक 'मिशन' मानले गेले आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी "दर्पण" या वृत्तपत्राची सुरुवात समाजाकरिता आरसा म्हणून पत्रकारितेकडे बघितले जावे या भावानेतून केली असावी असा मला विश्वास आहे. अत्यंत जबाबदारीने प्रत्येक गोष्ट समाजासाठी लिहिणे, दाखविणे हे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. "समाजाला दिशा द्यायची की समाजाची दशा करायची" हे पूर्णतः या क्षेत्रावर निर्भर आहे. कारण चुकीची माहिती लाखो लोकांचे सामान्य ज्ञान बिघडविण्यास कारणीभूत ठरू शकते, याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे असेही ते म्हणाले. आम्हाला संस्कारीत लोकशाही हवी आहे की स्वैराचारी लोकशाही याचा विचार करण्याची वेळ आली असून, संविधानातील हक्क आणि अधिकार याबाबत सर्वच बोलतात मात्र कर्तव्य काय आहेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी  जनजागरण करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, भाऊ तोरसेकर अतिशय निर्भीड व परखड पत्रकार आहेत. धनासाठी काम करणारी काही मंडळी या क्षेत्रात आहे अशी चर्चा सुरु असतानाच मनासाठी लिहिणारे, समाजासाठी बोलणारी हे आवर्जून अधोरेखित व्हावं अशी पत्रकारिता भाऊ तोरसेकर यांनी केली आहे.
पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणात पत्रकारितेतील त्यांचे अनुभव, सामाजिक राजकीय निरीक्षणे मांडून सत्काराबद्दल आभार व्यक्त केले. ना. रामदास आठवले, ना. गिरीश महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती आरती सदावर्ते-पुरंदरे यांनी केले.

Share News

copylock

Post Top Ad

-->