दि. १० नोव्हेंबर २०२३
Vidarbha News India
नागपुरात आशा वर्कर काळी दिवाळी साजरी करणार, हे आहे कारण..
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/नागपूर : दिवाळी दोन दिवसांवर आली तरी शहर व ग्रामीण आशा वर्करचे जुलै महिन्यापासूनचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे तातडीने मानधन न मिळाल्यास लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला संविधान चौकात काळे वस्त्र घालून काळी दिवाळी साजरी करू, असा इशारा सीटू या संघटनेने दिला.
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी.आय. टी.यू.) नागपूर जिल्हातर्फे गुरुवारी संविधान चौकात धरणे देण्यात आले. यावेळी संविधान चौकात चक्काजामही करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र साठे म्हणाले, दोन दिवसांवर दिवाळी आल्यावरही शहरी व ग्रामीण आशा वर्कर, गटप्रवर्तकच्या खात्यात जुलै महिन्यापासूनचे मानधन आले नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करणार, हा प्रश्न आहे.
गुरुवारी मुंबईत या कर्मचाऱ्यांच्या इतर प्रश्नांवर शासनासोबत आंदोलनकर्त्यांच्या कृती समितीची बैठक झाली. त्यात सकारात्मक निर्णय झाल्यावर महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीने संप मागे घेतला. त्यानुसार १० तारखेला संविधान चौकात आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे सकाळी १० वाजता आंदोलनाची समारोप सभा होणार आहे. त्याला राजेंद्र साठे उपस्थित राहून माहिती देतील. त्यापूर्वी सर्व आशा वर्कर, गटप्रवर्तक यांच्या खात्यात ३ महिन्यांचा थकीत मानधन जमा न झाल्यास लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला संविधान चौकात काळे वस्त्र धारण करून व रात्रभर बसून आशा वर्कर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचेही सीटूतर्फे यावेळी जाहीर करण्यात आले.