दि. ९ नोव्हेंबर २०२३
Vidarbha News India
गडचिरोली जिल्ह्यात 15 नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रेचा होणार शुभारंभ.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आदिवासी जिल्ह्यांना अग्रक्रम देण्यात आला असून गडचिरोली जिल्ह्यात 15 नोव्हेंबरपासून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. याबाबत केंद्र सरकारचे सहसचिव कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीला जिल्हाधिकारी संजय मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा नियोजन अधिकारी खडतकर आदी उपस्थित होते.
यावेळी कुणाल कुमार म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ गडचिरोली जिल्ह्यात 15 नोव्हेंबरपासून होत असून देशभर हा कार्यक्रम चालणार आहे. यात 70 जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे. यापुर्वीही असे अभियान राबविण्यात आले आहे. भारत सरकारच्या अनेक योजना ह्या जनउपयोगी आहेत. परंतु या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. ज्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे व ज्यांना याचा लाभ मिळणार आहे, याबाबतची नोंद ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात यावी.
विकसित भारत संकल्प यात्रेबाबतची माहिती लोकांना समजेल, अशा स्थानिक भाषेतून देण्यात यावी. व्हॅन द्वारे माहितीचे प्रसारण करण्यात येणार असून ग्रामीण व शहरी भागात 17 उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याकरीता 5 अतिरिक्त उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तसेच उपक्रम यशस्वी करण्याकरीता नोडल अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांची एक टीम तयार करण्यात येईल. सोबतच जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. यावेळी कुणाल कुमार यांनी मार्गक्रमण (रुट मॅप) तयार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
जिल्हाधिकारी संजय मिना म्हणाले, ही केंद्र सरकारची महत्वाची योजना असून गडचिरोली जिल्ह्याकडे सर्वांचे विशेष लक्ष असल्यामुळे नोडल अधिकारी व संबंधित सर्व अधिका-यांनी समन्वयातून हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा, अशा सुचना त्यांनी दिल्या.