दि. २८.११.२०२३
गोंडवाना विद्यापीठात संविधान दिन साजरा
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : अत्यंत विचारपूर्वक, अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार करून भारतीय संविधान तयार केले गेले. व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार यात केलेला आहे. भारतामध्ये विविधता असूनही संविधान सर्वसमावेशक आहे, प्रत्येकाने ते नीट वाचले पाहिजे म्हणजे आपले संविधान किती मौल्यवान आहे, हे समजेल.
आपण भारतीय भाग्यवान आहोत की, आपल्याकडे इतकी अनमोल राज्यघटना आहे. जगात अनेक देशांना स्वतःची राज्यघटनाच नाही. संविधान ही जीवनाची शक्ती आहे. असे प्रतिपादन अध्यक्ष स्थाना वरून बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. २६ नोव्हेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप बारसागडे उपस्थित होते.
या प्रसंगी संविधान उद्देशिकेचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांच्यासह सर्वांनी वाचन केले.
संचालन डॉ. सविता सादमवार यांनी केले तर आभार डॉ. प्रीती काळे यांनी आभार मानले.
यावेळी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.