दि. 27.11.2023
Vidarbha News India
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांची पाचव्यांदा धमकी.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून पुन्हा धमकी मिळाली आहे. गेल्या सहा महिन्यात आत्राम यांना पाचव्यांदा धमकीचे पत्र मिळाले आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे सुरू असलेल्या लोह खनिज प्रकल्पावरून राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री अत्राम यांना ही धमकी देण्यात आली आहे.
दोन महिन्यांपूर्वीही त्यांना धमकी देणारं एक पत्रक आढळलल्याने खळबळ उडाली होती.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे सुरू असलेला लोह खनिज प्रकल्प आणि नवीन सुरू होणाऱ्या पाच लोह खनिज प्रकल्पाच्या विरोधात नक्षलवादी नेहमीच पत्रकबजी करत असतात. या धमकीनंतर अत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचा गडचिरोली दौरा झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी तीन लोकांची हत्या केली. एक हत्या ही मुख्यमंत्री आले त्या दिवशी झाली तर त्यानंतरही नक्षलवाद्यांनी दोन जणांची हत्या केली. गडचिरोली जिल्ह्यात मायनिंग सुरू केल्याने जे लोक त्या मायनिंगच्या विरोधात आहे ते लोक धमकी देतात. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सोडणार नाही. ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करू. लोकांनी आम्हाला विकासासाठी निवडून दिलेलं आहे त्यामुळे आम्ही काम करणे बंद करणार नाही, असं आत्राम म्हणाले. लोकांचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. कितीही धमकी येऊ दे, आम्ही आमचं काम थांबवणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
मला आता ही पाचव्यांदा धमकी मिळाली आहे. यासंदर्भात गृहविभागाला जी कारवाई करायची असेल, ते ती कारवाई करतील. मी माझं स्वतःचं संरक्षण करेन, असं ते म्हणाले.
यापूर्वीही मिळाली होती धमकी.!
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांना यापूर्वीही अनेक वेळा धमकी देण्यात आली. सप्टेंबर महिन्यात, तसेच त्या आधीही आत्राम यांना पत्राद्नारे धमकी देण्यात आली होती. सूरजागड येथे गेल्या काही वर्षांपासून लोह खनिजाचे उत्खनन सुरू आहे. मात्र नक्षलवाद्यांचा त्याला सुरूवातीपासूनच विरोध आहेत. यासाठी मंत्री आत्राम हे जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी देणारे पत्र सप्टेंबर महिन्यात गट्टा परिसरात आढळले होते. त्यानंतर त्यांना आता पुन्हा धमकी मिळाली आहे.