पत्रकारांच्या लेखणीचा उपयोग समाज परिवर्तनासाठी व्हावा; - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

पत्रकारांच्या लेखणीचा उपयोग समाज परिवर्तनासाठी व्हावा; - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

दि. ९ नोव्हेंबर २०२३ 
Vidarbha News India 
पत्रकारांच्या लेखणीचा उपयोग समाज परिवर्तनासाठी व्हावा; - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
- सरदार हरविंदरसिंह धुन्ना लिखीत ‘भारतीय पत्रकारिता का इतिहास’ पुस्तकाचे प्रकाशन
विदर्भ न्यूज इंडिया 
चंद्रपूर : बदलत्या काळात पत्रकारितेचेही आयाम आणि नियम बदलले आहेत. आज व्हॉट्सॲप युनिर्व्हसिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. तसेच स्वत:च्या स्वार्थासाठी समाजात वैचारीक प्रदुषण वाढविण्यात येत आहे. त्यामुळे अशा बाबींना रोखण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत असून या लेखणीचा उपयोग समाज परिवर्तनासाठी व्हावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार सरदार हरविंदरसिंह धुन्ना यांनी लिहिलेल्या ‘भारतीय पत्रकारिता का इतिहास, कल-आज-कल’ या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात उद्घाटक म्हणून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाब-महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंचचे प्रांताध्यक्ष एच.पी.सिंग तर प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रावसाहेब मोहोड, ज्येष्ठ पत्रकार यशवंत दाचेवार, हरविंदरसिंह धुन्ना, डॉ. सतीश गोगूलवार, प्रा. विजय मुडे, राहुल पावडे, हार्दिक पाठक आदी उपस्थित होते.
पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील छायाचित्र अतिशय आकर्षक असून हे पुस्तक ज्ञानवर्धक आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सरदार हरविंदरसिंह धुन्ना यांनी अतिशय मेहनतीने हे पुस्तक लिहिले आहे. 400 पानांचे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी किमान 40 हजार पाने वाचली असतील. भविष्यातसुध्दा त्यांनी आणखी पुस्तके लिहावीत. पत्रकारितेसाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणार असून गोंडवाना विद्यापीठात वृत्तपत्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 
पुढे ते म्हणाले, सुरवातीपासूनच धुन्नाजी यांच्या कुटुंबियाशी आपल्या कुटुंबाचे सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. मी शिक्षणाने पत्रकार असून धुन्नाजी व्यवसायाने पत्रकार आहेत. माझ्या वृत्तपत्राचे प्रकाशन त्याकाळी धुन्नाजी यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज त्यांच्या पुस्तकाचे विमोचन माझ्या हस्ते करण्यात येत आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. धुन्नाजी यांनी पत्रकारिता हे समाज परिवर्तनाचे साधन मानले आहे. आजच्या युगात पत्रकारिता करणा-यांसाठी हे पुस्तक नक्कीच एक चांगली व्हॅक्सिन ठरावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार हरविंदरसिंह धुन्ना म्हणाले, हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेतील ही आवृत्ती वाचकांपर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राज्याला लाभलेले विकासपुरुष आणि कर्तव्यनिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे विमोचन होणे, हा एक अविस्मरणीय क्षण आहे. माध्यमांसमोर आज विश्वासअहर्तचे प्रश्नचिन्ह उभे असून बातमीदारांनी केवळ बातमीदार असावे, बातमीत स्वत:चे विचार व्यक्त करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. 
मागदर्शन करतांना ज्येष्ठ पत्रकार यशवंत दाचेवार म्हणाले, पत्रकारितेचा दृष्टीकोन बदलला असला तरी आजही प्रिंट मिडीयावर लोकांचा विश्वास कायम आहे. तिनही काळातील पत्रकारितेचे विश्लेषण या पुस्तकात आहे. निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी श्री. मोहोड म्हणाले, धुन्नाजी यांना 54 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. लघु वृत्तपत्रांना एकत्र करून त्यांनी लढा दिला आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. सतिश गोगूलवार म्हणाले, हरविंदरसिंह धुन्नाजी आणि मी बालपणीचे मित्र आहोत, एकाच शाळेत शिकलो. धुन्नाजी यांचे पत्रकारितेत मोठे योगदान आहे. तर प्रा. विजय मुडे म्हणाले, धुन्नाजी यांच्यात सुरवातीपासूनच प्रगल्भता होती, ती आजही आहे. पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तिंचा तसेच संस्थांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासावर हार्दिक पाठक यांचे व्याख्यान झाले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आरती दाचेवार यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
एस.एन.डी.टी. विद्यापीठात पत्रकारिता अभ्यासक्रम : जिल्ह्यात तरुणी आणि महिलांसाठी एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येत असून कौशल्य विकासावर आधारीत 62 प्रकारचे अभ्यासक्रम येथे शिकविण्यात येतील. पत्रकारिता हा अभ्यासक्रमसुध्दा यात समाविष्ट आहे. या माध्यमातून जिल्ह्यात महिला पत्रकारांची संख्या वाढण्यास मदत होईल.

Share News

copylock

Post Top Ad

-->