दि. ०६.१२.२०२३
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी देशाच्या कल्याणाचा आणि प्रगतीचा विचार केला; - प्रा. रणजित मेश्राम
- गोंडवाना विद्यापीठात व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतावर अपार प्रेम होते. ‘माझ्या देशावर प्रेम करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही’असे ते म्हणायचे. डॉ. आंबेडकरांनी परदेशी विद्यापीठांतून शिक्षण घेतले असले तरी त्यांचे सर्व अभ्यासाचे आणि प्रबंधाचे विषय भारताशी संबंधित होते. त्यांनी भारताच्या परिस्थितीचा अत्यंत सखोल आणि शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला. या देशाची स्पंदने त्यांनी खऱ्या अर्थाने समजून घेतली. त्यांनी नेहमी देशाच्या कल्याणाचा आणि प्रगतीचा विचार केला. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत आणि नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार प्रा.रणजीत मेश्राम यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठात आज व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप बारसागडे, आदी उपस्थित होते.
स्वतःतंत्र पूर्व काळाविषयी बोलताना ते म्हणाले, डॉ.आंबेडकरांची दूरदृष्टी होती. फक्त स्वातंत्र्य हेच सर्वस्व नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा कारभार कसा चालेल, याचाही विचार करणे आवश्यक आहे.
असे मत प्रा.मेश्राम यांनी व्यक्त केले.
डॉ.आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे निष्पक्षपाती आणि खुल्या मनाने पाहण्याची गरज आहे, असे प्रा.मेश्राम यांनी आवर्जून सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले,
गोंडवाना विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राव्दारे बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहचवण्याचे काम सुरू आहे. अशा विचारांचे संकलन करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राने घेतला आहे. माझी चमू अशाच प्रकारे हिरिरीने काम करेल अशी अशा मी व्यक्त करतो. तसेच या महामानवाविषयी माझी संप्रेरणा व्यक्त करतो असे ते याप्रसंगी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप बारसागडे, संचालन मराठीचे स. प्रा. डॉ. नीळकंठ नरवाडे,आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले.
या कार्यक्रमाला बाळासाहेब घरडे, वरिष्ठ पत्रकार रोहितदास राऊत, पत्रकार जयंत निमगडे,
कवियत्री कुसुम आलाम तसेच शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या समनव्यक डॉ. प्रीती काळे तसेच इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.