दि. १६ डिसेंबर २०२३
गोंडवाना विद्यापीठाला उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची सदिच्छा भेट.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी नुकतीच गोंडवाना विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. विद्यापीठ विकासाच्या विविध बाबींवर कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह चर्चा करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण,
सहसंचालक संतोष चव्हाण, सहसंचालक प्रकाश बच्छाव, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे प्रामुख्याने उपस्थित होते.
भेटी दरम्यान विद्यापीठातील मॉडेल डिग्री कॉलेजच्या स्वतंत्र महाविद्यालयाची त्यांनी पाहणी केली. यावेळी महाविद्यालयाद्वारे सुरू असलेल्या संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती जाणून घेतली. अभ्यासक्रमाची रचना करताना ज्या उद्देशाने मॉडेल डिग्री कॉलेजची स्थापना करण्यात आलेली आहे ते उद्देश या अभ्यासक्रमातून पूर्ण होतात की नाही हेही त्यांनी जाणून घेतले.गडचिरोली येथे सुरू असलेल्या मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये अतिशय नाविन्यपूर्ण व रोजगारक्षम अभ्यासक्रमाची रचना केल्याबद्दल संचालक डॉ. शलेंद्र देवळाणकर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मॉडेल डिग्री कॉलेज हे इतर महाविद्यालयासाठी नक्कीच मॉडेल असावे असा आशावादही त्यांनी भेटीदरम्यान व्यक्त केला. याप्रसंगी मॉडेल डीग्री कॉलेजची माहिती प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वाले यांनी दिली.
गडचिरोली येथील मॉडेल डीग्री कॉलेज द्वारे सुरू असलेला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे ' विद्यापीठ आपल्या गावात' हा अभ्यासक्रम अतिशय नाविन्यपूर्ण आहे असे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ गोंडवाना विद्यापीठ ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.यानंतर त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राला भेट दिली. यावेळी संचालक शैलेंद्र देवळाणकर यांचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राव्दारे विद्यार्थी निर्मित बांबू हस्तकलेचा गुलदस्ता भेट देऊन त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी एसटीआरसी निर्मित विविध वस्तूंची पाहणी केली तसेच तेथील विभागांची पाहणी केली.या विभागाची माहिती मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख आशिस घराई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या सीआयआयआयटी सेन्टर ची पाहणी केली. येथे निर्माण झालेल्या पायाभूत सोयीसुविधा मुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळून, उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेता येईल. आणि यातून कुशल मनुष्यबळ निर्माण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
'विद्यापीठ आपल्या गावात' आणि 'एकल प्रकल्प' यांचेही त्यांनी कौतुक केले.